IND vs ZIM हरारे : टीम इंडियाचा युवा कॅप्टन शुभमन गिलनं झिम्बॉब्वे विरुद्ध टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॅप्टन शुभमन गिल नं अभिषेक शर्मा, रियान पराग आणि ध्रुव जुरेल या तिघांना भारतीय संघात स्थान दिल्याचं सांगितलं. या तिघांनी भारतीय संघात पदार्पण केलं.
शुभमन गिलच्या नेतृत्त्वात युवा टीम इंडिया झिम्बॉब्वे विरुद्ध मैदानात उतरली आहे. भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यात पाच टी 20 सामन्यांची मालिका आजपासून सुरु होत आहे. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा भारताच्या डावाची सुरुवात करतील. तर, अनुभवी खेळाडू ऋतुराज गायकवाड तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करेल. रिंकू सिंगला देखील भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. भारताच्या गोलंदाजीची धुरा आवेश खान, मुकेश कुमार आणि खलील अहमद यांच्यावर आहे.
भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यात आतापर्यंत 8 टी 20 मॅच झाल्या आहेत. यापैकी 6 मॅच भारतानं जिंकल्या तर दोन मॅच झिम्बॉब्वेनं जिंकल्या आहेत. झिम्बॉब्वेनं भारताविरोधात 2015 मध्ये पहिल्यांदा मॅच जिंकली होती. त्यावेळी त्यांनी भारताला 10 धावांनी पराभूत केलं होतं. तर, 2016 मध्ये देखील भारताला झिम्बॉब्वेनं पराभूत केलं. विशेष म्हणजे दोन्ही मॅच हरारेमध्ये झाल्या होत्या.
अभिषेक शर्मा, रियान पराग अन् ध्रुव जुरेलचं पदार्पण
भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत युवा खेळाडू अभिषेक शर्मा, रियान पराग अन् ध्रुव जुरेलनं पदार्पण केलं आहे. अभिषेक शर्मा आणि रियान पराग या दोघांनी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती. अभिषेक शर्मानं 2024 च्या आयपीएलमध्ये 484 धावा केल्या होत्या. तर, राजस्थान रॉयल्सकडून खेळताना रियान परागनं 573 धावा केल्या होत्या. तर ध्रुव जुरेलनं इंग्लंड विरु्द्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली होती.
तिसऱ्या मॅचपासून यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे आणि संजू सॅमसन संघात सहभागी होणार असल्यानं युवा खेळाडूंना केवळ दोन मॅच मध्ये कामगिरी करुन दाखवावी लागणार आहे.
भारताची प्लेईंग इलेव्हन : शुभमन गिल (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद
झिम्बॉब्वेची प्लेईंग इलेव्हन : तदिवानाशे मारुमनी, इनोसेंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कॅप्टन), डायोन मायर्स, जॉनाथन कैंपबेल, क्लाइव मैडेंडे (विकेटकीपर), वेस्ली मधेवेरे, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुजरबानी, तेंडाई चटारा
संबंधित बातम्या :