India Tour of Zimbabwe, 2022: भारतीय क्रीडा चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवलेला केएल राहुल तंदुरुस्त झालाय. मागील काही दिवसांपासून तो बेंगळुरु येथील एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत होता. बीसीसीआयकडून केएल राहुल तंदुरुस्त असल्याचं सांगण्यात आलेय. तसेच भारताच्या आगामी झिम्बाब्वे दौऱ्यात तो संघाचा कर्णधार असणार आहे. बीसीसीआयने गुरुवारी संध्याकाळी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे, 30 जुलै रोजी बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली होती. त्यामध्ये केएल राहुलचं नाव नव्हतं. तीन एकदिवसीय सामन्यासाठी संघाची धुरा शिखर धवनकडे सोपवण्यात आली होती. मात्र, 10 दिवसांत शिखर धवनच्या जागी केएल राहुलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे शिखर धवनचे चाहते नाराज झाल्याची चर्चा आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात शिखर धवनला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. 

बीसीसीआयने ट्विट करत राहुल फिट असून झिम्बाब्वे दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यात संघाचं नेतृत्व करणार असल्याचं सांगितलं आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीमध्ये राहुलला खेळण्यासाठी परवानगी दिली आहे.

 
 
झिम्बाब्वे विरोधात तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ - 
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.

झिम्बॉब्वे- भारत एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक-

सामना कधी ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 18 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब
दुसरा एकदिवसीय सामना 20 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब
तिसरा एकदिवसीय सामना 22 ऑगस्ट 2022 हरारे स्पोर्ट्स क्लब

दरम्यान, तब्बल सहावर्षानंतर भारतीय संघ झिम्बॉवेचा दौरा करणार आहे. यापूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2016 मध्ये भारतानं झिम्बॉब्वे दौरा केला होता. त्यावेळी भारतानं झिम्बॉवेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळली होती.  “भारताचं यजमानपद मिळवून आम्हाला खूप आनंद झालाय. आम्ही स्पर्धात्मक आणि अविस्मरणीय मालिकेची वाट पाहत आहोत”, असं झिम्बाब्वे क्रिकेटच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलंय.