IND vs WI T20I Indian Predicted playing XI : फ्लोरिडा येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा सामना होणार आहे. भारतासाठी हा सामना करो या मरो असा आहे. टीम इंडियाचा आज पराभवाचा सामना करावा लागल्यास मालिका गमावावी लागेल. आज होणाऱ्या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. काही जणांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो अन् युवा खेळाडूंना संधी मिळू शकते.  हार्दिक पांड्या अॅण्ड कंपनी विजयासाठी मैदानात उतरेल. दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या संघाच्या नजरा मालिका विजयाकडे असतील. त्यामुळे आज होणारा सामना रंगतदार होईल.  मागील सात वर्षांत वेस्ट इंडिजला भारताविरोधात टी20 मालिका जिंकता आली नाही. कॅरेबिअन आर्मीने 2016 मध्ये अखेरची टी20 मालिका जिंकली होती. 


पहिल्या दोन सामन्यात फ्लॉप गेलेल्या सूर्यकुमार यादव याने तिसऱ्या सामन्यात विडिंजची गोलंदाजी फोडून काढली. तिलक वर्मा याने सूर्यकुमार याला चांगली साथ दिली. तिलक वर्माने तिन्ही सामन्यात दर्जेदार फलंदाजी केली. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. सलामी फलंदाज शुभमन गिल तिन्ही सामन्यात फेल गेला. पदार्पण करणारा यशस्वी जयस्वाल यालाही चमकदार कामगिरी करता आली नाही. कर्णधार हार्दिक पांड्यालाही अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. गोलंदाजीत कुलदीप आणि चहल यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. हार्दिकनेही अचूक टप्प्यावर मारा केलाय. आज होणाऱ्या चौथ्या टी20 सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतोय ? याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागलेय. 


तिसऱ्या सामन्यातील विजयानंतरही हार्दिक पांड्या प्लेईंग 11 मध्ये बदल करण्याची शक्यता आहे. गयाना येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने सात विकेटने विजय मिळवला होता. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत 2-1 ने असे कमबॅक केलेय. पहिल्या दोन्ही सामन्यात विडिंजने बाजी मारली होती, तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारताने कमबॅक केले. आज भारतासाठी करो या मरोचा सामना असेल. या सामन्यात बदलाची शक्यता आहे. शुभमन गिल याला वगळण्याची शक्यता आहे. धडाकेबाज ईशान किशन याचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.  गोलंदाजीमध्येही बदलाची शक्यता वर्तवण्यात येतेय. 
 
चौथ्या सामन्यासाठी कसा असेल भारतीय संघ - 


यशस्वी जायसवाल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल,  उमरान मलिक