India vs Western Australia XI, 2nd Match: वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताला 30 धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय. दरम्यान, 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया वेस्टर्नच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजाच्या नाकी नऊ आणले. भारताला 20 षटकात 8 विकेट्स गमावून 132 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून सलामीवीर केएल राहुलनं (KL Rahul) एकाकी झुंज दिली. त्यानं 55 चेंडूत 74 धावांची वादळी खेळी केली. मात्र, राहुल आऊट झाल्यानंतर भारताच्या कोणत्याही फलंदाजाला संघाचा डाव सावरता आला नाही. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांनाही संघाला विजय मिळवून देता आला नाही.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर अर्शदीप सिंहनं जोश फिलिपच्या रुपात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. मात्र, त्यानंतर डी आर्सी शॉर्ट आणि निक हॉबसन संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. दोघांमध्ये 115 धावांची भागेदारी झाली. दरम्यान, चौदाव्या षटकात हर्षल पटेलनं दोन विकेट्स घेऊन वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकललं. हर्षल पटेलनं या षटकातील तिसऱ्या चेंडूवर निक होबसनला आऊट केलं. याच षटकातील अखेरच्या चेंडूवर डी अर्सी शॉर्टलाही पव्हेलियनचा रस्ता दाखवला गेला. त्यानंतर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला काही खास कामगिरी करता आली नाही. वेस्टर्न ऑस्ट्रेलियानं 20 षटकात 8 विकेट्स गमावून 162 धावा केल्या. भारताकडून आर.अश्विननं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, हर्षल पटेलला दोन विकेट्स मिळवता आल्या. याशिवाय, युवा गोलंदाज अर्शदीपच्या खात्यातही एक विकेट्स जमा झाली.
ट्वीट-
केएल राहुलची एकाकी झुंज व्यर्थ
वेस्टर्न ऑस्ट्रेलियानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. केएल राहुलसोबत सलामी देण्यासाठी मैदानात आलेला ऋषभ पंत अवघ्या 9 धावांवर आऊट झाला. त्यानंतर दिपक हुडा (9 चेंजू 6 धावा), हार्दिक पांड्या (19 चेंडू 17 धावा), अक्षर पटेल (7 चेंडू 2 धावा) आणि दिनेश कार्तिकही (14 चेंडूत 10 धावा) स्वस्तात माघारी परतले. परंतु, केएल राहुलनं संघासाठी एकाकी झुंज सुरूच ठेवली. मात्र, 19व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अँड्र्यू टायनं केएल राहुलला आऊट करून भारतीय संघाला मोठा धक्का दिला. ज्यामुळं भारतानं हा सामना 30 धावांनी गमावला. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू केली आणि लान्स मॉरिस यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळाल्या. तर, जेसन बेहरेनडॉर्फ, अँड्र्यू टाय, हॅमिश मॅकेन्झी आणि जोश फिलिप यांच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट्स जमा झाली.
हे देखील वाचा-