बंगळुरु : भारत आणि श्रीलंका या दोन संघात बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सुरु असलेल्या डे-नाईट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी कर्णधार रोहित शर्माच्या षटकाराने एक चाहता जखमी झाला. हिटमॅनच्या षटकाराने या चाहत्याच्या नाकाचं हाड मोडलं आहे. त्याच्या हाडाला हेअरलाईन फ्रॅक्चरसह खोल जखमही झाली आहे. पिंक बॉल वापरुन खेळवल्या जाणाऱ्या या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ही घटना घडली.
सामन्याच्या सहाव्या षटकात विश्वा फर्नांडोंच्या एका चेंडूवर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पुल शॉट खेळला. 22 वर्षीय गौरव विकास हा चेंडूचा बळी ठरला. हा चेंडू सीमारेषेच्या पार जाऊन प्रेक्षकांमध्ये पडला. यावेळी गौरव विकास बॉल पकडण्याचा प्रयत्न करत होता. परंतु हा पिंक बॉल हातात न येता थेट जाऊन त्याच्या नाकावर आदळला. परिणामी नाकाला खोल जखम झाली आणि त्यामधून रक्त येऊ लागलं. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने आधी गौरवला स्टेडियमच्या मेडिकल रुममध्ये नेलं आणि तिथे प्रथमोपचार दिले. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं, जिथे त्याच्या जखमेवर टाके घालण्यात आले. त्याच्या नाकाच्या हाडाला हेअरलाईन फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं.
भारत मालिका विजयाच्या उंबरठ्यावर
श्रीलंका विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्यावर टीम इंडिया आपली पकड मजबूत केली आहे. भारतीय संघाने श्रीलंकेला 447 धावांचं लक्ष्य दिलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एका विकेटच्या मोबदल्याच 28 धावा केल्या होत्या. आला श्रीलंकेच्या टीमला सामना जिंकण्यासाठी आणखी 419 धावा करायच्या आहेत. परंतु पिचची स्थिती पाहता लंकेचा संघ हे लक्ष्य पार करण्याची शक्यता फारच कमी आगे. त्यामुळे दिवस-रात्र कसोटीत टीम इंडियाचा मोठा विजय होऊ शकतो. सध्या भारताचा संघ या दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 असा आघाडवर आहे.
दुसरी कसोटी आतापर्यंत
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. ज्यानंतर भारतीय फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. पण श्रेयस अय्यरच्या 92 धावांनी भारतीय संघाचा डाव 252 पर्यंत पोहोचवला. ज्यानंतर भारतीय संघाला 252 धावांत बाद केल्यानंतर प्रत्युत्तरदाखल मैदानात उतरलेल्या श्रीलंका संघाची फलंदाजीही ढासळली. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे लंकेच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. एँजलो मॅथ्युजचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. मॅथ्युजने 43 धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद शामीला दोन तर अक्षर पटेलला एक विकेट मिळाली. दुसऱ्या दिवशी भारताने आणखी उत्तम गोलंदाजी करत 109 धावांत श्रीलंकेच्या संघाला गुंडाळले, ज्यानंतर पंतच्या दमदार अर्धशतकासह श्रेयसच्या 67 आणि रोहितच्या 46 धावांच्य़ा जोरावर 303 धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे श्रीलंकन संघापुढे विजयासाठी 447 धावांचं आव्हान होतं. बुमराहने एक विकेट घेतल्याने आता श्रीलंकेला विजयासाठी 419 धावांची गरज असून भारताला 9 विकेट्स मिळवण्याची गरज आहे.
दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिलीच कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने एक डाव आणि 222 धावांनी जिंकला होता. आता दुसऱ्या सामन्यातही भारत विजयाच्या उंबरठ्यावर असून श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याची नामी संधी भारताकडे आहे.