Asia Cup 2023: आज आशिया चषकाच्या (Asia Cup 2023) अंतिम सामन्यात टीम इंडियाचा (Team India) सामना यजमान श्रीलंकेशी होणार आहे. आशिया चषकाच्या अंतिम फेरीत टीम इंडिया आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात सामना होण्याची ही आठवी वेळ असेल. आतापर्यंत दोन्ही संघांमधील 7 अंतिम सामन्यांमध्ये टीम इंडियानं चार वेळा विजय मिळवला आहे, तर श्रीलंकेनं तीन वेळा विजय मिळवला आहे. टीम इंडियानं आशिया चषकाचे विजेतेपद विक्रमी 7 वेळा जिंकलं आहे. त्यामुळे, यंदा टीम इंडियाला हरवून श्रीलंकेलाही चौथ्यांदा आशिया चषक उंचावून टीम इंडियाच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे.


यंदा श्रीलंकेच्या संघानं सर्वांना चकित करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. हसरंगासारख्या स्टार अष्टपैलू खेळाडूच्या दुखापतीमुळे श्रीलंकन ​​संघासाठी अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास फारचा कठीण जाईल, असं बोललं जात होतं. मात्र युवा खेळाडूंच्या जोरावर श्रीलंकेनं पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. आज टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषकाचा अंतिम सामना होणार आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात जर पावसानं हजेरी लावली तर अंतिम सामन्यासाठी एक राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. आज पाऊस आला तर उद्या (सोमवारी) अंतिम सामना खेळवला जाईल. 




आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रेमदासा स्टेडियमवर आज भारत-श्रीलंका संघ आमने-सामने येणार आहेत. या स्पर्धेतील सुपर फोर फेरीत भारताने श्रीलंका आणि पाकिस्तान दोघांनाही धूळ चारली होती. तर, श्रीलंकेने आधी बांगलादेशला पराभूत केलं आणि नंतर पाकिस्तानवर अखेरच्या चेंडूवर मात करत फायनल गाठलीय. त्यामुळे आजच्या सामन्यात मनोबल उंचावलेल्या श्रीलंकन टीमसमोर भारताचा कस लागणार हे नक्की. या सामन्यात भारतासाठी अक्षर पटेलची दुखापत ही काहीशी चिंतेची बाब आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना त्याला ही दुखापत झालीय. त्याच्यासाठी राखीव खेळाडू म्हणून अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला पाचारण करण्यात आलंय. तर, श्रीलंकेचा फिरकीपटू महेश तीक्ष्णा दुखापतीमुळे अंतिम सामन्यात खेळू शकणार नाही. त्याची अनुपस्थितीही लंकन टीमला जाणवू शकते. या सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ नये अशी अपेक्षा क्रिकेटरसिक करतायत. 


टीम इंडियाची धडाकेबाज कामगिरी 


आशिया कपमध्ये भारताची कामगिरी संमिश्र राहिली आहे. ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. यानंतर टीम इंडियानं नेपाळविरुद्ध शानदार पुनरागमन केलं. चौथ्या फेरीच्या सामन्यात टीम इंडियानं पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला. चौथ्या फेरीच्या सामन्यातही टीम इंडियानं श्रीलंकेचा सहज पराभव केला. त्यानंतर अत्यंत चुरशीच्या सामन्यात टीम इंडियाचा बांगलादेशकडून 6 धावांनी पराभव झाला.


टीम इंडियाला अंतिम फेरीत कोणत्याही प्रकारचा प्रयोग परवडणारा नाही. या सामन्यासाठी विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज सारखे दिग्गज खेळाडू संघात पुनरागमन करणार असल्याची खात्री आहे. उपकर्णधार हार्दिक पांड्यालाही अंतिम फेरीसाठी प्लेईंग 11 मध्ये प्रवेश मिळेल. अक्षर पटेल दुखापतीमुळे बाहेर असेल. खेळपट्टीचे स्वरूप लक्षात घेता टीम इंडिया अंतिम सामन्यात तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.