Ravindra Jadeja Asia Cup 2023 : भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आशिया चषकाची फायनल लढत होणार आहे. रविवारी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर दोघांमध्ये लढत होणार आहे. सुपर ४ च्या अखेरच्या सामन्यात बांगलादेश संघाने भारताचा पराभव केला होता. बांगलादेशविरोधात भारतीय संघाची फलंदाजी फ्लॉप गेली होती.  त्यापूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात भारतीय खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत होता. संपूर्ण आशिया चषकात भारताचा रविंद्र जाडेजा याला लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. रविंद्र जाडेजा याला आपल्या प्रतिभेला न्याय देता आला नाही. रविंद्र जाडेजा याच्या कामगिरीवरुन अनेकांनी टीका केली आहे. दिनेश कार्तिक याने जाडेजाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थिते काल आहे. 


रविंद्र जाडेजा याला यंदा आशिया चषकातील सर्व सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, पण तो छाप पाडण्यात अपयशी ठरला. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये त्याला अपयश आले. पाकिस्तानविरोधात पहिल्या सामन्यात जाडेजा फक्त १४ धावा काढू शकला. नेपाळ आणि पाकिस्तान यांच्याविरोधात फलंदाजीची संधी मिळाली नाही. श्रीलंकाविरोधात फक्त चार तर बागंलादेशविरोधात सात धावा काढता आल्या. 


फलंदाजीशिवाय गोलंदाजीतही जाडेजा प्रभावहीन झाला. एकाही सामन्यात लौकिकास साजेशी गोलंदाजी करता आली नाही. नेपाळविरोधात ४० धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. श्रीलंकाविरोधात ३३ धावांच्या मोबदल्यात दोन विकट घेतल्या. पाकिस्तानविरोधात एकही विकेट मिळाली नाही. बांगलादेशविरोधात ५३ धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली. आशिया चषकाच्या पाच सामन्यात जाडेजा याने फलंदाजी फक्त २५ धावा केल्या तर गोलंदाजीत सहा विकेट घेतल्या. 


टीम इंडियाचा दुसरा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याची कामगिरीही सरासरीच राहिली आहे.  त्याने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 87 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती. मात्र यानंतर तो श्रीलंकेविरुद्ध अवघ्या 5 धावा करून बाद झाला. पण पंड्याने गेल्या तीन सामन्यांत सातत्याने विकेट घेतल्या. त्याने श्रीलंका, पाकिस्तान आणि नेपाळविरुद्ध प्रत्येकी एक विकेट घेतली. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून पांड्याला विश्रांती देण्यात आली होती. अंतिम फेरीसाठी त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.


 आशिया चषका 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर लढत होणार आहे. ३० ऑगस्टपासून सुरु असणाऱ्या स्पर्धेचा विजेता रविवारी मिळणार आहे. अंतिम सामन्यावर पावसाचे सावट आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे, फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. सुपर ४ फेरीत श्रीलंकेला हरवत भारताने फायनलमध्ये प्रवेश केला होता. फायनलचे तिकिट मिळवणारा भारत पहिला संघ ठरला होता. पाकिस्तानचा पराभव करत श्रीलंका संघाने फायनलमध्ये प्रवेश केला होता. आता रविवारी आशिया चषकाचा किंग कोण? यावरुन पडदा उठणार आहे. पण भारत आणि श्रीलंका आशिया चषकाच्या फायनलमध्ये आठव्यांदा आमनेसामने आलेत. याआधी या दोन संघामध्ये सातवेळा स्पर्धा रंगली होती.  रविवारी आशिया चषकाचा किंग कोण? यावरुन पडदा उठणार आहे.