India vs Sri Lanka : पुण्याच्या एमसीए ग्राऊंडवर भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) सामना खेळवला जात असून श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत तब्बल 206 धावांचा डोंगर उभारला आहे. श्रीलंकेचा कॅप्टन दासुन शनाका (Dasun Shanka) याने तब्बल 6 षटकार आणि 2 चौकार ठोकत 22 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या आहेत. तर कुसल मेंडिसनेही 52 धावा केल्यामुळे श्रीलंकनं ही मोठी धावसंख्या उभारली आहे. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली गोेलंदाजी केली पण नंतर श्रीलंकेच्या फलंदाजांनी केलेल्या दमदार फटकेबाजीमुळे 200 पार धावसंख्या पोहोचली आहे. 


सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रीलंका संघाने चांगली सुरुवात केली. सलामीवीर पाथुम आणि कुसल यांनी अर्धशतकी भागिदारी पूर्ण केली. मग कुसलला 52 धावांवर चहलनं बाद करत भारताला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. त्यानंतर श्रीलंकेचे काही विकेट्स स्वस्तात गेले. पाथुमनं 33 तर चरिथ असलंकाने 37 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण अखेरच्या षटकांमध्ये कॅप्टन दासून शनाकाने अवघ्या 22 चेंडूत नाबाद 56 धावा करत एक धमाकेदार खेळी दाखवून दिली. त्याला करुनारत्ने यानेही नाबाद 11 धावा केल्या आणि 20 षटकांत 6 गडी गमावत श्रीलंकेनं 206 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. भारताकडून उमरानने 3, अक्षरने 2 आणि चहलने 1 विकेट घेतली.




भारताचा निर्णय चूकला?


आजचा सामना होणाऱ्या पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर T20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 153 धावा इतकी आहे. तर दुसऱ्या डावात 128 धावा झाल्या आहेत. त्यामुळे येथे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभाराण्याची रणनीती आखतो. तरीही भारताने काहीसा वेगळा प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर श्रीलंकेनंही अगदी तडाखेबाज फटकेबाजी करत 206 धावांचा डोंगर उभारला आहे. आता भारताला हे आव्हान पार करता येईल का? हे पाहावे लागेल. 


हे देखील वाचा-