IND vs SL 1st T20: शिवम मावीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पहिल्या टी20 सामन्यात भारताने दोन धावांनी विजय मिळवला. पदार्पणाच्या सामन्यात शिवम मावीनं चार बळी घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारतानं दिलेल्या 163 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 20 षटकांत 160 धावांपर्यंत पोहोचला. शिवम मावीने चार तर उमरान मलिक आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन दोन बळी घेतले.
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. 12 धावांवर त्यांना पहिला धक्का बसला. सलामी फलंदाज निसांका अवघ्या एका धावांवर बाद झाला. त्यानंतर 24 धावांवर दुसरी विकेट गेली तर 51 धावांत श्रीलंकेचे चार फलंदाज तंबूत परतले होते. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंका संघाचे ठरावीक अंतरावर विकेट पडत गेल्या. श्रीलंकेकडून कर्णधार दसुन शनाकाने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. त्याशिवाय वानंदु हसरंगा 21, चामिरा करुनार्त्ने 23 तर कुसर मेंडिसने 28 धावांची खेळी केली. पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले.
दीपक हुड्डा-अक्षरची तुफान फटकेबाजी
श्रीलंका संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. पदार्पण करणाऱ्या शूभमन गिल याला महेश तिक्ष्णा याने सात धावांवर माघारी धाडले. त्यानंतर फॉर्मात असणाऱ्या सूर्यकुमार यादव याला चामिरा करुणारत्ने याने तंबूचा रस्ता दाखवला. संजू सॅमसनलाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. संजू पाच धावा काढानू माघारी परतला. इशान किशन आणि हार्दिक पांड्यानं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण इशान किशन आणि हार्दिक एकापाठोपाठ एक बाद झाल्यानंतर भारताच्या अडचणी वाढल्या. अखेर दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांनी डाव सावरत भारताला सन्माजनक धावसंख्या उभारुन दिली. दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांच्या खेळीच्या बळावर भारतानं निर्धारित 20 षटकात 162 धावांपर्यंत मजल मारली होती. सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन आणि शुभमन गिल यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांनी मोक्याच्या क्षणी भारताची धावसंख्या वाढवली. दीपक हुड्डानं 23 चेंडूत 41 धावांची खेळी केली. तर अक्षर पटेलनं 20 चेंडूत 31 धावांची खेळी केली. इशन किशननं 29 चेंडूत 37 धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्यानं 27 चेंडूत 29 धावांची खेळी केली. वानिन्दु हसरंगा, चामिका करुणारत्ने, महेश तिक्ष्णा, आणि दिलशान मदुशंका यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.