South Africa tour of India: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात मंगळवारी इंदोरच्या (Indore) होळकर क्रिकेट स्टेडियमवर (Holkar Cricket Stadium) तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना खेळला गेला. या सामन्यात भारताला 49 धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय. परंतु, या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून भारतानं आधीच मालिका आपल्या नावावर केली. दक्षिण आफ्रिकेनं तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतासमोर विजयासाठी 20 षटकात 228 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात भारतीय संघाचा डाव 18.3 षटकात 178 धावांवर आटोपला. भारताकडून दिनेश कार्तिकनं 21 चेंडूत सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. मात्र, या सामन्यात शून्यावर बाद झालेल्या कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर नकोशा विक्रमाची नोंद झालीय. 


दक्षिण आफ्रिकेच्या 227 धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताच्या डावातील दुसऱ्या चेंडूवर कागिसो रबाडानं कर्णधार रोहित शर्माला शून्यावर आऊट केलं. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट होणारा रोहित शर्मा पहिला भारतीय कर्णधार ठरलाय. कर्णधार म्हणून रोहित शर्मानं सर्वाधिक चार वेळा शून्यावर आऊट झालाय. या यादीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली दुसऱ्या तर शिखर धवन तिसऱ्या क्रमांकावर आहे.


शून्यावर बाद होणारे भारतीय कर्णधार
आंतराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं कर्णधार असताना तीन वेळा एकही धाव न करता माघारी परतलाय. तर, कर्णधार म्हणून शिखर धवननं आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एक वेळा शून्यावर विकेट्स गमावली आहे. विशेष म्हणजे, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 62 डावात फलंदाजी केलीय. पण तो कधीही शून्यावर बाद झाला नाही. 


भारतानं टी-20 मालिका जिंकली
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना तिरुवानंतपुरममध्ये खेळला गेला होता, जो भारतानं 8 धावांनी जिंकला. त्यानंतर गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला 16 धावांनी पराभवाची धुळ चारली. यासह भारतानं पहिल्यांदाच मायदेशात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला टी-20 मालिकेत पराभूत केलंय. मात्र, अखेरच्या टी-20 सामन्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला क्लीन स्पीप देण्याच्या उद्देशानं मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या पदरात निराशा पडली. या सामन्यात भारताला 49 धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय. 


भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेला उद्यापासून सुरुवात
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला उद्या म्हणजेच 6 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीनं अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. या मालिकेत शिखर धवन भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, संजू सॅमसनवर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. याशिवाय, अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 


हे देखील वाचा-