IND Vs SA, 2nd ODI : यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या फटकेबाजीला कर्णधार के. एल. राहुलने दिलेल्या संयमी साथ आणि अखेरच्या क्षणी शार्दुल ठाकूरने केलेल्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने निर्धारित 50  षटकांत 6 बाद 287 धावांपर्यंत मजल मारली आहे. दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी भारताने 288 धावांचे आव्हान दिले आहे. दक्षिण आफ्रिकाकडून Tabraiz Shamsi ने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर मागला, मार्करम,  केशव महाराज आणि Phehlukwayo यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली आहे. (India given target of 288 runs against South Africa )


भारतीय कर्णधार के. एल. राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही, पहिल्या सामन्यातील संघ कायम ठेवण्यात आला होता.  शिखर धवन आणि राहुल यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पहिल्या दहा षटकांत भारतीय संघाने 58 धावा चोपल्या होत्या. पण त्यानंतर शिखऱ आणि विराट कोहली यांनी लागोपाठ विकेट फेकल्या. त्यानंतर ऋषभ पंतने तडकाफडकी फलंदाजी करत भारतीय संघाची धावसंख्या वाढवली. पंतने 71 चेंडूत 85 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान पंतने 10 चौकार आणि 2 षटकार लगावले.


पंतशिवाय कर्णधार के. एल राहुलने संयमी फलंदाजी केली. राहुलने 79 चेंडूचा सामना करत 55 धावा केल्या. राहुलने मोक्याच्या क्षणी विकेट फेकली. मैदानावर स्थिर झाल्यानंतर राहुल धावांचा पाऊस पडेल असे वाटत होतं, तेव्हाच राहुल बाद झाला. राहुलनंतर पंतही लगेच माघारी परतला. अय्यरलाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. भारतीय संघ 250 धावांपर्यंत जाईल का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण पुन्हा एकदा लॉर्ड शार्दुल ठाकूर धावून आला. शार्दुलने अश्विनसोबत भारतीय संघाची धावसंख्या 287 पर्यंत पोहचवली. शार्दुल ठाकूरने 40 धावांची खेळी केली. तर अश्विनने 25 धावांची खेळी केली. पंत आणि राहुल यांच्या शतकी भागिदारीच्या बळावर भारतीय संघाने 287 धावा केल्या. माजी कर्णधार विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. शिखर धवनने 29 धावांची छोटेखानी खेळी केली. 


दरम्यान, तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 31 धावांनी पराभव पत्कारावा लागला होता. यामुळं एकदिवसीय मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला आजचा सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे.