India Playing 11 Vs South Africa 1st Test : भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यामध्ये मंगळवारपासून (26 डिसेंबर) बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरेल. टीम इंडियाने आतापर्यंत आफ्रिकेत एकदाही कसोटी मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे कसोटी मालिकेत आफ्रिकेचा पराभव करत रोहित शर्माला इतिहास रचण्यास आतुर असेल. 


सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार होता. तर वनडे मालिकात केएल राहुल यांनी टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. आता  कसोटी मालिकेत संघाची धुरा रोहित शर्माच्या हाती आहे. रोहित शर्मासोबत विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे दिग्गजही कसोटी मालिकेसाठी संघात पुनरागमन करणार आहेत. 


सलामीला कोण? 
 
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातत सलामीला कोण उतरणार ? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. टीम इंडियात कर्णधार रोहित शर्मासोबत शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल आणि अभिमन्यू ईश्वरन आहेत. याशिवाय संघात केएस भरत आणि केएल राहुल विकेटकिपर म्हणून आहेत. या दोघांपैकी एकच प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसणार आहे. मात्र, राहुलने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये विकेटकीपिंग केलेले नाही. तो पहिल्यांदा विकेटकिपिंगसाठी उतरेल.  रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल सलामीला उतरणार अन् शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळणार का? हे मंगळवारीच स्पष्ट होईल.


कशी असेल प्लेईंग 11  - 


पहिल्या कसोटी सामन्यात  यशस्वी जास्वाल आणि रोहित शर्मा डावाची सुरुवात करू शकतात. त्यानंतर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर खेळण्याची खात्री आहे. केएल राहुल सहाव्या क्रमांकावर दिसू शकतो. यानंतर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा खेळू शकतात. तर वेगवान गोलंदाजीत मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि शार्दुल ठाकूर हे पर्याय असतील. 


पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11 - 
 
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज. 


कधी सामना ?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क या मैदानात येथे खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार,  दुपारी 1.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.  यानंतर दुसरा कसोटी सामना 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान न्यूलँड्स, केपटाऊन येथे खेळवला जाईल. हा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे. 









भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा कसोटी सामना टिव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. त्याशिवाय मोबाईलवर सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांना डिस्नेप्लस हॉटस्टारवरही सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.