Champions Trophy 2025 IND vs PAK नवी दिल्ली: चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. पाकिस्तानकडे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाची जबाबदारी आहे. भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही. याबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार बीसीसीआयनं आयसीसीला निर्णय कळवला असल्याची माहिती आहे. याबाबत बीसीसीआयकडून लेखी देण्यात आलेलं नाही. भारतानं नकार दिल्यानं चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड पद्धतीनं आयोजित करावी लागेल, मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हायब्रीड मॉडेलला तयार नसल्याची माहिती समोर आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी 2025 पासून सुरु होणार आहे. 9 मार्चला चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम लढत होणार आहे. इंडिया टुडेच्या एका बातमीनुसार बीसीसीआयनं आयसीसीला चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भातील निर्णय तोंडी कळवला आहे. याबाबत लेखी देण्यात आलेला नाही. बीसीसीआयनं सुरक्षेच्या कारणांचा दाखला देत पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे. टीम इंडिया पाकिस्तानला क्रिकेट खेळण्यासाठी न गेल्यानं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी वेळापत्रकाची घोषणा कधी होणार?
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर बीसीसीआय त्याबाबत घोषणा करु शकते. बीसीसीआयनं अद्याप त्यांच्या सोशल मीडियावर याबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. भारतानं गेल्या जवळपास 17 वर्षांपासून कोणतीही द्वीपक्षीय मालिका खेळलेली नाही. भारतीय क्रिकेट संघ आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही हे स्पष्ट झालंय.
हायब्रीड मॉडेलला पीसीबीचा नकार
क्रिकइन्फोच्या एका रिपोर्टनुसार पीसीबीनं टीम इंडिया आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवर प्रतिक्रिया दिली आहे. पीसीबीचे चेअरमन मोहसीन नकवी यांनी ते हायब्रीड मॉडेलसाठी तयार नसल्याचं म्हटलं. हायब्रीड मॉडेल कोणत्याही प्रकारे मान्य करणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. 2023 मध्ये भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात आला होता. मात्र, आता टीम इंडिया पाकिस्तानला जाण्यास तयार नाही. त्यामुळं नवा पेच निर्माण झाला आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकाच गटात आहेत. भारताचा आणि पाकिस्तानचा सामना 1 मार्च रोजी आयोजित करण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड हे संघ एकाच गटात आहेत. ऐनवेळी भारत स्पर्धेत सहभागी न झाल्यास श्रीलंकेला या संधी मिळू शकते.