IND vs NZ 2nd ODI: पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाच्या प्लेईंग11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यजमान न्यूझीडंलने पहिल्या सामन्यात भारताचा सात गड्यांनी पराभव केला. भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना सात गड्यांच्या मोबदल्यात 306 धावांचा डोंगर उभा केला होता. न्यूझीलंडने हे आवाहान सात गडी राखून 48 व्या षटकात पूर्ण केले होतं. श्रेयस अय्यर (80), कर्णधार शिखर धवन (72) आणि शुभमन गिल (50) यांनी अर्धशतकी खेळी केली होती. तर न्यूझीलंडकडून टॉम लेथम यानं शतकी खेळी केली होती. तर केन विल्यमसन यानं निर्णायाक अर्धशतकी खेळी केली होती. 


पहिल्या सामन्यात कमकुवत गोलंदाजी 
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमकुवत गोलंदाजी केली होती. 307 धावांचा बचाव भारतीय गोलंदाजांना करता आला नाही. विल्यमसन आणि लेथम यांनी सहज या धावांचा पाठलाग केला होता. अर्शदीपने 8 षटकात 68, चहलने 10 षटकात 67, उमरान मलिकने 10 षटकात 66 तर शार्दुल ठाकूरने 9 षटकात 63 धावा दिल्या होत्या. वॉशिंगट सुंदर याचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला धावा रोखता आल्या नव्हत्या. वॉशिंगटन सुंदरने दहा षटकात 42 धावा खर्च केल्या होत्या. उमरान मलिकला दोन विकेट तर शार्दुल ठाकूरला एक विकेट मिळाली होती. 


दुसऱ्या सामन्यात बदल होणार?
पहिल्या सामन्यात गोलंदाजी निष्प्रभ झाली होती. त्यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. शिखर धवन दुसऱ्या सामन्यात चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला स्थान देऊ शकतो. कुलदीप आणि चाहल ही जोडी मैदानात दिसू शकते. त्याशिवाय शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चाहरला प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात येऊ शकते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान रविवारी सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.


सिडॉन पार्कवर भारताची खराब कामगिरी-
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये हॅमिल्टनच्या सिडॉन पार्कवर सामना होणार आहे. या मैदानावर भारतीय संघानं आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. यामध्ये भारतीय संघाला आठ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. तीन सामन्यात भारताला विजय मिळवता आला आहे. भारताने या मैदानावर न्यूझीलंडविरोधात सात सामने खेळले आहेत, यापैकी सहा सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालाय. 


कुठे पाहता येणार सामना?


या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.