IND vs NZ, T20 Series : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर (IND vs NZ T20) टीम इंडिया आता टी-20 सामन्यांसाठी सज्ज झाली आहे. आज अर्थात शुक्रवारपासून (27 जानेवारी) दोन्ही संघात टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना रांची येथील जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स (JSCA Cricket Stadium) येथे खेळवला जाईल. विशेष म्हणजे, मागील एका वर्षापासून भारतीय संघाने एकही टी-20 मालिका गमावली नसून रांचीमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्डही मजबूत असल्याने आज भारत जिंकेल अशी दाट शक्यता आहे.
रांचीमधील भारताचे पाच मोठे विक्रम
- सर्वोच्च धावसंख्या : भारत 196/6 वि. श्रीलंका 2016
- सर्वाधिक धावा : रोहित शर्मा 109 धावा
- सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजी : आर अश्विन वि. श्रीलंका 2016 (3 विकेट्स)
- सर्वाधिक विकेट्स : आर अश्विन. 4 विकेट्स
- सर्वोच्च भागीदारी : रोहित शर्मा आणि केएल राहुल 117 धावा, 2021 वि. न्यूझीलंड
न्यूझीलंड मागील 11 वर्षांपासून टी-20 मालिकेत होतोय पराभूत
न्यूझीलंडचा संघ गेल्या 11 वर्षांपासून भारतीय भूमीवर टी-20 मालिका जिंकण्यात अपयशी ठरला आहे. 2012 मध्ये किवींनी शेवटची टी20 मालिका भारतीय भूमीवर जिंकली होती. न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या मालिकेत भारताचा 1-0 असा पराभव केला. त्यानंतर जेव्हा-जेव्हा न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर टी-20 मालिका खेळायला आला, तेव्हा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2017 मध्ये न्यूझीलंडने भारतीय भूमीवर तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली, जी भारताने 2-1 ने जिंकली. आणि 2021 च्या मालिकेत टीम इंडियाने किवींचा 3-0 असा पराभव केला होता.
रांचीमध्ये टीम इंडिया अजिंक्य
रांचीच्या जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय संघाचा टी-20 रेकॉर्ड खूप मजबूत आहे. या मैदानावर टीम इंडिया आतापर्यंत टी-20 मध्ये अजिंक्य आहे. भारताने रांचीमध्ये तीन सामने खेळले असून ते जिंकण्यात त्यांना यश आले आहे. या मैदानावर भारतीय संघाने श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा पराभव केला आहे. सध्या भारताचा T20 संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ज्यामुळे न्यूझीलंडला भारताची विजयी मोहीम रोखणं सोपं असणार नाही.
कशी आहे येथील खेळपट्टी?
रांचीमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अधिक फायदेशीर नाही. याठिकाणी फिरकीपटूंना अधिक फायदा मिळत असल्याचं दिसून आलं आहे.पण खेळपट्टीची एकूण परिस्थिती पाहता फलंदाजांना अधिक फायदा होतो. विशेष म्हणजे, या मैदानावर खेळल्या गेलेल्या 28 T20 सामन्यांमध्ये, फक्त एकदाच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला 200 च्या वर धावा करता आल्या आहेत. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 160 च्या मध्यभागी आहे. त्यात भारतातील अलीकडच्या काळातील सामने पाहता आज संघांनी 200 च्या वर धावा केल्या तर आश्चर्य वाटणार नाही. मैदानात पडणारं दव हा देखील एक महत्त्वाचा घटक आज राहणार आहे. आणि पाठलाग करणाऱ्या संघांला अधिक फायदा मिळू शकणार असल्याने गोलंदाजी घेणं नाणेफेक जिंकणारा संघ पसंत करेल, अशी शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
India vs New Zealand T20 : एकदिवसीय मालिका विजयानंतर आता टी20 चा थरार, सर्व माहिती एका क्लिकवर