IND vs IRE 1st T20 1st Innings : भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात पावसाने खोडा घातला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियंमानुसार लागला. भारतीय संघाने दोन धावांनी सामन्यात बाजी मारली. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना सात विकेटच्या मोबदल्यात 139 धावांपर्यंत मजल मारली होती. आयर्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामी फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. पावसामुळे सामना थांबण्यापूर्वी भारताने 6.5 षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात 47 धावा केल्या. पावसामुळे सामना थांबला तेव्हा भारतीय संघ डकवर्थ लुईस नियमांनुसार दोन धावांनी आघाडीवर होता. त्यामुळे भारतीय संघाला दोन धावांनी विजयी घोषीत केले.
यशस्वी जायस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी 46 धावांची सलामी दिली. यशस्वी जायस्वाल याने 24 धावांचे योगदान दिले. यशस्वीने 23 चेंडूत एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 24 धावांची खेळी केली. तिलक वर्माला खातेही उघडता आले नाही. ऋतुराज गायकवाड 16 चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 19 धावांवर नाबाद राहिला. संजू सॅमसन एका धावेंवर नाबाद होता. आयर्लंडकडून क्रेग यंग याने दोन विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या आयर्लंडची सुरुवात खराब झाली. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीला अतिशय भेदक मारा करत आयर्लंडच्या फलंदाजांना तंबूत धाडले होते. 31 धावांत आयर्लंडचे पाच गडी तंबूत परतले होते. सुरुवातीची फळी लवकर बाद झाल्यानंतर आयर्लंडचा डाव लवकर संपणार का ? असे वाटत होते. पण तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. आयर्लंडने दमदार पुनरागमन करत भारतीय गोलंदाजी फोडून काढली. 31 धावांत आयर्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला होता. कर्णधार पॉल स्ट्रलिंग यालाही मोठी खेळी करता आली नाही. आघाडीचेचार फलंदाजांना तर दुहेरी धावसंख्याही ओलांडता आली नाही.
कर्टिस कम्फर आणि बैरी मैक्ग्राथी यांनी ताबोडतोड फलंदाजी करत आयर्लंडची धावसंख्या वाढवली. बैरी मैक्ग्राथी याने अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. बैरी मैक्ग्राथी याने 33 चेंडूत चार षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने नाबाद 51 धावांची खेळी केली. तर कर्टिस कम्फर याने 33 चेंडूत एक षटकार आणि तीन चौकाराच्या मदतीने 39 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले.
बुमराहचे दमदार पुनरागमन -
तब्बल वर्षभरानंतर जसप्रीत बुमराह क्रिकेटच्या मैदानावर परतला. त्याने दणक्यात कमबॅक केले. बुमराहने पहिल्याच षटकात चार धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या होत्या. बुमराह याने चार षटकात 24 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. बुमराहने आपले अखेरच्या षटकात फक्त एक धाव दिली.
अर्शदीपचे महागडे षटक -
अखेरच्या षटकात अर्शदीप सिंह याने खराब गोलंदाजी केली. अर्शदीप सिंह याने अखेरच्या षटकात तब्बल 22 धावांची लयलूट केली. अर्शदीपच्या अखेरच्या षटकात McCarthy याने अर्शदीपची गोलंदाजी फोडून काढली. त्याने दोन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 22 धावा चोपल्या. जसप्रीत बुमराह याने 19 व्या षटकात भेदक मारा करत आयर्लंडच्या गोलंदाजांना थोपवलं होतं. बुमराहने 19 व्या षटकात फक्त एक धाव देत धावसंख्येला आवर घातली होती. पण बुमराहच्या मेहनतीवर अर्शदीप सिंह याने पाणी फेरले.
भारताची गोलंदाजी कशी ?
भारताकडून जसप्रीत बुमराह, पदार्पण करणारा प्रसिद्ध कृष्णा आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर अर्शदीप याला एक विकेट मिळाली. वॉशिंगटन सूंदर आणि शिवब दुबे यांच्या विकेटची पाटी कोरीच राहिली.