Sarfaraz Khan and Musheer Khan: टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील राजकोट कसोटीत (Rajkot Test) सरफराज खाननं (Sarfaraz Khan) धमाकेदार पदार्पण केलं. पदार्पणातच अर्धशतक झळकावताना सरफराजनं 9 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीनं 61 धावांची खेळी रचली. मात्र, त्याला या खेळीचं शतकात रूपांतर करता आलं नाही. रवींद्र जाडेजानं दिलेल्या चुकीच्या कॉलमुळे तो धावबाद झाला. टीम इंडियासाठी पदार्पण केल्यानंतर आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, सरफराज खान त्याचा धाकटा भाऊ मुशीर खान (Musheer Khan) याच्याशी व्हिडीओ कॉलवर बोलला. या व्हिडीओ कॉलवर सरफराजनं मुशीरच्या भारतीय क्रिकेट संघातील प्रवेशाची भविष्यवाणी केली आणि सांगितले की, तू सुद्धा एक दिवस इथे येशील.
मुशीर खानलाही भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळणार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात, BCCI नं अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राजकोट कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळानंतर सरफराज खान त्याचा धाकटा भाऊ मुशीरशी बोलताना दिसत होता. या व्हिडीओमध्ये सरफराजनं मुशीरला त्याच्या खेळाबद्दल विचारलं. मुशीरनं कॉलवर सरफराजचं भरभरून कौतुक केलं आणि म्हटलं, "तुझी धमाकेदार खेळी पाहून मजा आली."
दरम्यान, मुशीरनं सांगितलं की, "जो रूटविरुद्ध तू स्वीप शॉट खेळलास त्यावेळी तुझ्या बॅटच्या टॉप एज्डला बॉल लागला मी घाबरलो होतो." त्यावर सरफराजनं मुशीरला सांगितलं की, "अरे मी पाहिलेलं, फिल्डर फार पुढे होते, त्यामुळे मी स्वीप शॉट खेळला." तसेच, पुढे बोलताना सरफराजनं मुशीरबाबत एक मोठी भविष्यवाणी केली. सरफराज म्हणाला की, "एक दिवस तूसुद्धा इथे खेळायला येशील. बघ माझी टेस्ट कॅप."
सरफराजचा लहान भाऊ स्फोटक फलंदाज
सरफराज खान प्रमाणेच त्याचा लहान भाऊ मुशीर खान देखील स्फोटक गोलंदाज आहे. नुकत्याच पार पडलेल्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय क्रिकेट संघाचा भाग होता. या स्पर्धेत त्यानं धमाकेदार कामगिरी करत सर्वांना दखल घेण्यास भाग पाडलं होतं. या विश्वचषकात त्यानं 2 शतकांच्या मदतीनं एकूण 360 धावा केल्या. मुशीरच्या फलंदाजीचे अनेक दिग्गजांनी खूप कौतूक केलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :