IND vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लड यांच्या तिसरा कसोटी सामना 25 ऑगस्टपासून लीड्समध्ये खेळवण्यात येणार आहे. 19 वर्षांनी लीड्समधील हेडिंग्ले मैदानात भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या 6 सामन्यांमध्ये टीम इंडियाला दोन सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे. तर इंग्लंडनं 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आलेला एक सामना ड्रॉ राहिला आहे. 


लीड्समध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये इंग्लंडनं विजय मिळवला होता. परंतु, 1986 आणि 2002 मध्ये भारतीय संघानं या मेदानावर फक्त विजयच मिळवला नाही, तर पहिल्या डावात 279  धावांनी आणि दुसऱ्या डावात 46 धावांच्या फरकानं इंग्लंडचा पराभव केला होता. अशातच आता पुन्हा एकदा टीम इंडियाकडे इतिहास रचण्याची संधी आहे. 


1986 मध्ये अत्यंत रोमांचंक लढत 


लीड्स मैदानावर 1986 मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत भारतानं 272 धावांचा डोगंर रचला होता. दिलीप वेंगसरकर यांनी सर्वाधिक 61 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा पहिला डाव केवळ 102 धावांवर गुंडाळला होता. रोजर बिन्नीनं 5 आणि मदन लालनं 3 विकेट्स घेत सीमिंग पिचवर इंग्लंडला पुढे जाऊ दिलं नाही. दुसऱ्या डावात दिलीप वेंगसरकर यांनी नाबाद शतक लगावत इंग्लंडसमोर 237 धावांचा डोंगर रचला. इंग्लंडचा दुसरा डावही 128 धावांवर गुंडाळला. दुसऱ्या डावात भारताचे मनिंदर सिंह यांनी 4 विकेट्स घेतले होते. वेंगसरकर यांना मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आलं होतं. 


2002 मध्येही दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत 


16 वर्षांनी जेव्हा 2002 मध्ये भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ या मैदानावर आमने सामने आले, तेव्हा सौरव गांगुली टीम इंडियाचे कर्णधार होते. या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाच्या तीन फलंदाजांनी शतकी खेळी करत 628 धावांचा डोंगर रचला होता. राहुल द्रविडनी 148, सचिन तेंडुलकरनं 193 आणि सौरव गांगुलीनं 128 धावा केल्या होत्या. इंग्लंड दोन्ही डावांत 273 आणि 309 धावाच करु शकला. दोन्ही डावांत अनिल कुंबळेनं एकूण 7 विकेट्स घेतले होते. 


यंदा टीम इंडिया जिंकण्यासाठी उतरणार मैदानावर 


पुन्हा एकदा हेडिंग्ले मैदानावर टीम इंडिया इंग्लंडसोबत भिडणार आहे. कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना 25 ऑगस्टपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वीपासूनच टीम इंडिया अत्यंत मजबूत स्थितीत आहे. टीम इंडियाचे सर्व गोलंदाज फॉर्मात आहेत. तर फलंदाजही धावांचा डोंगर रचण्यासाठी सज्ज आहेत. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनीही लॉर्ड्सवरील कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात पुन्हा परतण्याचे संकेत दिले आहेत. आता केवळ कर्णधार विराट कोहली पुन्हा आपल्या फॉर्मात येण्याची प्रेक्षकांना अपेक्षा आहे.