T20 World Cup 2024 Semi Final : टी20 विश्वचषक 2024 च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताचा सामना इंग्लंडविरोधात होणार आहे. वेस्ट इंडिजमधील गयाना येथे हे दोन्ही संघ भिडणार आहेत. हा सामना गुरूवारी संध्याकाळी 8 वाजता पार पडणार आहे. टी20 विश्वचषक 2024 मध्ये टीम इंडिया तुफान फॉर्मात असून एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे इंग्लंडसाठी हा सामना सोपा नसेल. साखळी आणि सुपर 8 च्या प्रत्येक सामन्यात भारतीय विजयाचा नायक वेगळा राहिलाय, विराट कोहलीसारखा दिग्गज फॉर्मात नसतानाही फलंदाजीवर कोणताही फरक पडलेला नाही. इंग्लंडविरोधात भारताचे कोणत्या पाच शिलेदारांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील, हे पाच खेळाडू टीम इंडियासाठी गेम चेंजर ठरतील. त्याबाबत पाहूयात.


रोहित शर्मा  - 


भारताचा कर्णधार रोहित शर्मा टी20 विश्वचषकात वेगळ्याच लयीत आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात तर रोहित शर्माने स्टार्क अन् पॅट कमिन्सचा धुरळा उडवला होता. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरोधात 41 चेंडूत 92 धावांचा पाऊस पाडला होता. विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक धावा काढणार्‍या फलंदाजात रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने 6 सामन्यात 159.16 च्या स्ट्राईक रेटने 191 धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या नावावर दोन अर्धशतके आहेत. त्याने 13 षटकार आणि 16 चौकार ठोकले आहेत. 


ऋषभ पंत -


दुखापतीनंतर ऋषभ पंत याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात कमबॅक केलेय. विकेटच्या मागे करिष्मा दाखवणाऱ्या पंतने फलंदाजीतही आपली दबदबा राखलाय. पाकिस्तानविरोधात पंतने खेळलेली इनिंग सर्वांना आठवत असेलच.. पण त्याशिवाय इतर सामन्यातही त्यानं आपलं मोलाचं योगदान दिले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी कऱणाऱ्या पंतने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. पंतच्या नावावर एकही अर्धशतक नाही, पण रोहित शर्मानंतर सर्वाधिक धावा त्याच्याच नावावर आहेत.पंतने सहा सामन्यात 34 च्या सरासरीने 167 धावा केल्या आहेत. यामध्ये 19 चौकार आणि सहा षटकाराचा समावेश आहे. इंग्लंडविरोधात पंतची खेळी निर्णायक ठरेल, यात शंकाच नाही. 


हार्दिक पांड्या 


हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे टीम इंडियाचं संतुलन अधिक वाढते. हार्दिक पांड्या गोलंदाजीत चार षटकं फेकतोयच, त्याशिवाय फलंदाजी करताना अखेरच्या षटकात फटकेबाजी करतो. हार्दिक पांड्याला चार सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली, त्यामध्ये त्याने 116 धावांचा पाऊस पाडलाय. त्याच्या नावावर एक अर्धशतक आहे. हार्दिक पांड्याने 145 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली आहे. त्याने 9 चौकार आणि सात षटकार ठोकले आहेत. 


गोलंदाजीतही हार्दिक पांड्याने आपली कामगिरी चोख बजावली आहे. हार्दिक पांड्याने सहा सामन्यात आठ विकेट घेतल्या आहेत. 27 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. हार्दिक पांड्याने प्रतिषटक 7.47 धावा खर्च केल्या आहेत. 


जसप्रीत बुमराह -


सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात भलेही जसप्रीत बुमराहचे नाव नसेल, पण त्याचा इम्पॅक्ट प्रचंड आहे. पॉवरप्ले अथवा डेथ षटके असो.. बुमराहने भेदक मारा केला. भारताला जेव्हा जेव्हा विकेटची गरज असते, तेव्हा तेव्हा बुमराह यश मिळवून देतोय. बुमराहने 6 सामन्यात 11 विकेट घेतल्या आहेत, त्याचा इकॉनॉमी फक्त 4 इतका राहिलाय.  बुमराहने आतापर्यंत 23 षटकं गोलंदाजी केली, त्यामध्ये त्याने फक्त 94 धावा खर्च केल्या आहेत. प्रत्येक आठव्या चेंडूवर बुमराह विकेट घेतोय. 


कुलदीप यादव  - 


रोहित शर्माचा हुकमी एक्क ठरला तो म्हणजे कुलदीप यादव... साखळी सामन्यात कुलदीप यादव संघाबाहेर होता. पण सुपर 8 मध्ये त्याला संधी मिळाली... त्याचं त्यानं सोनं केले. कुलदीप यादवने तीन सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत. प्रत्येक 10 व्या चेंडूवर कुलदीप विकेट घेतोय. त्याने 12 षटकं गोलंदाजी केली, त्यामध्ये 75 धावा खर्च केल्या आहेत.