IND vs ENG 5th T-20 : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेती आज अतिशय रोमांचक सामना खेळला जाणार आहे. चौथ्या टी -20 सामन्यात भारताच्या विजयानंतर मालिका 2-2 अशी बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत मालिकेच्या अंतिम सामन्यात फायनल सारखी स्थिती बनली आहे. हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्यावर दोन्ही संघांचे लक्ष असणार आहे.


या मालिकेचे पहिले तीन सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले. परंतु चौथ्या सामन्यात टीम इंडियाने दुसऱ्यांदा गोलंदाजी करताना सामना जिंकला आहे. या मालिकेत भारताने जिंकलेल्या दोन सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी मोठे योगदान दिले. पहिल्या विजयात ईशान किशन आणि दुसर्‍या विजयात सूर्यकुमार यादवने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


या सामन्यात सलामीवीर केएल राहुलचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय असेल. मात्र रोहित शर्मासोबत राहुल सामन्याची सुरुवात करेल का हे अद्याप स्पष्ट नाही. या मालिकेत राहुलने अनुक्रमे 1, 0, 0 आणि 14 धावा केल्या आहेत. त्याच्या कारकिर्दीतील ही आतापर्यंतची सर्वात वाईट मालिका ठरली आहे. असे असूनही कर्णधार विराट कोहली आणि टीम मॅनेजमेंटचा त्याच्या खेळावर पूर्ण विश्वास आहे.


अंतिम सामना धीम्या खेळपट्टीवर खेळला जाऊ शकतो


अहवालानुसार मालिकेचा अंतिम सामना धीम्या विकेटवर खेळला जाऊ शकतो. वास्तविक, या मालिकेच्या पहिल्या आणि तिसर्‍या सामन्यात खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना खूप मदत करत होती. यामुळे इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. पण चौथ्या सामन्यात खेळपट्टी खूपच हळू होती, ज्यामुळे वेगवान गोलंदाजांना जास्त उसळी मिळत नव्हती. पाचव्या टी -20 मध्येही खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरू शकते.


टीम इंडियात एक बदल होण्याची शक्यता


टीम इंडियाने चौथ्या टी -20 सामन्यात जबरदस्त विजय मिळवला. तरी कर्णधार विराट कोहली पाचव्या सामन्यासाठी संघात बदल करू शकतो. डावखुरा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरच्या जागी आयपीएल 2020 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या राहुल तेवतियाला या सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. कोहलीने तेवतियाला अंतिम सामन्यात संधी दिली नाही तर युझवेंद्र चहलचं सुंदरच्या जागी पुनरागमन होऊ शकतं.


इंग्लंड संघात मोईन अलीला संधी मिळू शकते


इंग्लंडच्या संघाने या मालिकेत आतापर्यंत फक्त एक स्पिनर खेळवला आहे. मात्र अंतिम सामन्यात इंग्लंड मोईन अलीला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करू शकते. मोईनला सॅम करनच्या जागी संधी मिळू शकते. या मालिकेत सॅमने आतापर्यंत सरासरी कामगिरी केली आहे.


भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.


इंग्लंड संघः इयोन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम कुरन, टॉम कुरन, ख्रिस जॉर्डन, लिम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मालन, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स , रीस टोपली आणि मार्क वुड.