Ind vs Eng 4th Test Shubhman Gill On Rishabh Pant: इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत (India vs England) भारताचा 22 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. तसेच पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 2-1 ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा विकेटकीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने दुसऱ्या डावात विकेटकीपिंग केली नाही. ऋषभ पंतच्या जागी ध्रुव जुरेलने विकेटकीपिंगची भूमिका बजावली. त्यामुळे ऋषभ पंत चौथ्या कसोटी सामन्यासाठी तंदुरुस्त आहे की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने (Shubhman Gill) याबाबत आता महत्वाची माहिती दिली आहे. 

Continues below advertisement

Continues below advertisement

गिलने पंतच्या दुखापतीबद्दल काय म्हटले?

भारत आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना 10 जुलैपासून लॉर्ड्सवर सुरू झाला आणि सामन्याच्या पहिल्याच दिवशी पंतला दुखापत झाली. इंग्लंडच्या फलंदाजीदरम्यान दुसऱ्या सत्रात जसप्रीत बुमराहचा चेंडू रोखण्याचा प्रयत्न करताना पंतच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. यामुळे त्याला मैदान सोडावे लागले आणि त्यानंतर तो या सामन्यात एकदाही विकेटकीपिंग करू शकला नाही. त्याच्या जागी ध्रुव जुरेलने यष्टीरक्षकाची जबाबदारी स्वीकारली. पंतने दोन्ही डावात फलंदाजी केली असली तरी, या काळात तो सतत वेदनांमध्ये असल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत, लॉर्ड्सवरील सामन्याच्या शेवटच्या दिवशी संघाच्या पराभवानंतर, शुभमन गिलला पत्रकार परिषदेत पंतच्या तंदुरुस्तीबद्दल विचारण्यात आले. यावेळी गिल म्हणाला, ऋषभ स्कॅनसाठी गेला होता. त्याबाबत रिपोर्टही आला आहे. त्याची दुखापत फार गंभीर नाही, त्यामुळे तो 23 जुलैपासून मँचेस्टरमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी तंदुरुस्त असेल. 

पंतच्या दुखापतीचा टीम इंडियावर परिणाम

टीम इंडियाचा उपकर्णधार पंतने या मालिकेत सातत्याने चांगली फलंदाजी केली होती. दुखापत असूनही, पंतने पहिल्या डावात 74 धावांची जोरदार खेळी केली आणि या काळात त्याने केएल राहुलसोबत 141 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. परंतु तिसऱ्या दिवशी लंचच्या आधी तो धावबाद झाला, ज्यामुळे टीम इंडियाकडून आघाडी घेण्याची संधी हिरावून घेण्यात आली. त्यानंतर सामन्याच्या शेवटच्या दिवशी, जेव्हा पंत दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आला तेव्हा टीम इंडियाला 135 धावांची आवश्यकता होती. पंत हा टीम इंडियाची सर्वात मोठी आशा होती पण 2 चौकार मारल्यानंतर तो वेदनेने त्रस्त दिसत होता आणि शेवटी जोफ्रा आर्चरच्या एका शानदार चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला.

संबंधित बातमी:

India vs England 3rd Test: टीम इंडियाचे 10 खेळाडू ज्याला नडले; सामना जिंकताच त्याने काय केले?, PHOTO