Team India Star Players Report Card Ranji Trophy : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सततच्या अपयशानंतर टीम इंडियाचे स्टार खेळाडू रणजी ट्रॉफीच्या मैदानात उतरले. क्रिकेट चाहते आणि संघ व्यवस्थापनाला आशा होती की टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू घरच्या मैदानावर पूर्ण गुणांसह पास उत्तीर्ण होतील. पण, आतापर्यंतची स्टोरी एकदम उलट राहिली आहे. रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएल राहुल यांच्यासह भारतीय खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये अत्यंत अपयशी ठरले. जम्मू आणि काश्मीरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहित शर्माची कामगिरी खुपच खराब होती, तर यशस्वी,राहुल, पंत आणि अय्यर यांनीही नवीन गोलंदाजांसमोर सहज हार मानली. 


संघातील दिग्गज खेळाडू पडले तोंडावर 


रणजी ट्रॉफीचा दुसरा टप्पा सुरू झाला तेव्हा सर्वांच्या नजरा रोहित शर्मावर होत्या. पण जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या दोन्ही डावांमध्ये भारतीय कर्णधार वाईटरित्या अपयशी ठरला. पहिल्या डावात रोहितने 19 चेंडूंचा सामना केल्यानंतर फक्त 3 धावा काढल्या. तर, दुसऱ्या डावात हिटमन 28 धावा करून बाद झाला. यशस्वीचीही तीच कहाणी होती. टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज दोन्ही डावात फक्त 30 धावा करू शकला. चॅम्पियन्स ट्रॉफी संघात स्थान मिळाल्यानंतर, श्रेयस अय्यर रणजी लढाईतही पूर्णपणे अपयशी ठरला. अय्यरला दोन डावात फक्त 28 धावा करता आल्या.


पंत-राहुलही ठरले फ्लॉप 


ऑस्ट्रेलियन भूमीवर आपल्या चांगल्या सुरुवातीनंतर मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्यात सातत्याने अपयशी ठरलेला ऋषभ पंत स्थानिक क्रिकेटमध्येही आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे. सौराष्ट्रविरुद्ध खेळताना पंत पहिल्या डावात फक्त एक धाव करू शकला, तर दुसऱ्या डावात त्याने 17 धावा केल्या. कर्नाटककडून हरियाणाविरुद्ध खेळणारा केएल राहुल फलंदाजीने काही खास कामगिरी करू शकला नाही. पहिल्या डावात चांगली सुरुवात केल्यानंतर राहुलने 26 धावा काढल्यानंतर त्याची विकेट भेट म्हणून दिली. आता दुसऱ्या डावात राहुल कोणती ताकद दाखवणार हे पाहणे रंजक ठरेल.


गोलंदाजांचीही वाईट कामगिरी 


रणजी ट्रॉफीमध्ये फक्त फलंदाजच नाही तर गोलंदाजांनीही वाईट कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर फॉर्मशी झुंजताना दिसणारा मोहम्मद सिराज रणजीमध्येही फॉर्ममध्ये दिसला नाही. विदर्भाविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात सिराजने पहिल्या डावात 18 षटके टाकली. पण, या स्पेलमध्ये सिराज किफायतशीर होता, परंतु त्याला फक्त एकच बळी मिळाला. दुखापतीतून परतल्यानंतर कुलदीप यादवही लयीत दिसत नव्हता. हे वृत्त लिहिताना, कुलदीपने 10 षटके टाकली होती पण त्याला फक्त एकच विकेट घेता आली. प्रसिद्ध कृष्णा देखील फॉर्ममध्ये नव्हता.


फक्त गिल आणि जडेजा झाले पास


भारतीय संघातून फक्त शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा यांनीच अपेक्षेनुसार कामगिरी केली आहे. पंजाबकडून खेळणाऱ्या गिलने दुसऱ्या डावात शतक झळकावले. गिलने 171 चेंडूत 102 धावांची दमदार खेळी केली. त्याच वेळी, सर जडेजा बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये लयीत दिसले. जड्डूच्या फिरकीची जादू शिगेला पोहोचली होती आणि त्याने पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 7 बळी घेतले. सामन्यात 12 विकेट्स घेण्याव्यतिरिक्त, जडेजाने 36 चेंडूत 38 धावांची दमदार खेळीही केली. 


हे ही वाचा -


KL Rahul : रोहित, पंतनंतर KL राहुल देखील ठरला फेल, रणजी ट्रॉफीमध्ये 37 चेंडूत केल्या फक्त इतक्या धावा