IND vs ENG 2nd Test Day 1: चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर इंग्लंड विरोधात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस हिटमॅन रोहित शर्माने गाजवला. रोहित शर्माने दुसर्‍या कसोटी सामन्यात 161 धावांचा शानदार डाव खेळला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने सहा गडी गमावत 300 धावा केल्या आहेत. मैदानावर ऋषभ पंत 33 आणि डेब्यू मॅन पाच धावांवर नाबाद परतला. रोहित शर्माशिवाय अजिंक्य रहाणेनेही भारताकडून 67 धावा केल्या. त्याचवेळी इंग्लंडकडून मोईन अली आणि जॅक लीच यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.


पहिल्या सत्रात भारताची सुरुवात खराब झाली. परंतु, चौथ्या विकेटसाठी रोहित आणि रहाणे यांच्यातील 162 धावांच्या मजबूत भागीदारीमुळे टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले. पहिल्या सत्रात भारताने शुभमन गिल (0), चेतेश्वर पुजारा (21) आणि कर्णधार विराट कोहली (0) असे गडी गमावले. पण यानंतर रोहित आणि रहाणेने भारताचा डाव ताब्यात घेत संघाला संकटातून बाहेर काढलं.


रोहितने 231 चेंडूत 161 धावा केल्या. या दरम्यान त्याने आपल्या फलंदाजीत 18 चौकार आणि दोन षटकार लगावले. दुसरीकडे रहाणेने 149 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. या दोघांनी दुसर्‍या सत्रामध्ये भारताला कोणताही धक्का बसू दिला नाही.


तिसर्‍या सत्रात जॅक लीचच्या चेंडूवर स्वीप मारणाच्या नादात रोहित झेलबाद झाला. त्यानंतर थोड्याच वेळात मोईन अलीने रहाणेला बाद केले आणि भारताला पाचवा धक्का दिला.


भारतीय संघाने 249 धावांत पाच बळी गमावल्यानंतर ऋषभ पंत आणि आर अश्विन यांनी चांगली खेळी करायला सुरुवात केली. पण जो रूटने अश्विनला (13) 284 धावसंख्या असताना तंबूचा रस्ता दाखवला.


पहिल्याच दिवशी फिरकीपटूंचा चेंडू बराच टर्न घेत होता. शेवटच्या सत्रामध्ये लीच आणि मोईन आणखी घातक गोलंदाजी करत होते. पण पंतने आपला नैसर्गिक खेळ केला आणि दोन्ही फिरकीपटूंवर शॉट्स लगावले. त्याने 56 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकारासह 33 धावांची नाबाद खेळी केली.


मोईन अली इंग्लंडसाठी खूप महाग ठरल्याचे पाहायला मिळाले. त्याने 26 षटकांत 112 धावा दिल्या. यात त्याने दोन विकेट मिळविण्यात यश मिळविले. त्यामानाने जॅक लीचने गोलंदाजीवर बरेच नियंत्रण ठेवले. त्याने 26 षटकांत केवळ 78 धावा देऊन दोन बळी घेतले. या व्यतिरिक्त, ओली स्टोन आणि जो रूट यांना प्रत्येकी एक गडी बाद केला.