India Vs England 2nd Odi Records: पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारताला सहा विकेट्सने पराभूत केले. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-1 अशी बरोबरी केली आहे. आता अंतिम सामना रविवारी खेळवाला जाणार आहे. कालच्या सामन्यात इंग्लंडसमोर भारताने 337 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं. इंग्लंडने हे लक्ष्य अवघ्या 43.3 षटकांत सहा विकेट्स राखून गाठलं. इंग्लंडने त्यांच्या वनडे इतिहासातील सर्वात मोठं रन चेस केलं आहे. या सामन्यात कोणते मोठे रेकॉर्ड बनले आणि मोडले यावर एक नजर टाकूया. 


इंग्लंडने एकदिवसीय सामन्यात सर्वात मोठं रन चेस केलं


दुसर्‍या सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारताच्या 337 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला. पहिल्या विकेटसाठी जेसन रॉय (55) आणि जॉनी बेअरस्टो (124) यांनी 110 धावांची भागीदारी केली. यानंतर, बेन स्टोक्स (99) आणि बेअरस्टो यांनी दुसऱ्या विकेटसाठी 175 धावांची भागीदारी करत भारताकडून सामना खेचला. वनडे क्रिकेटमधील इंग्लंडचा हा सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आहे.


IND VS ENG : इंग्लंडचं जोरदार प्रत्युत्तर; भारताचा 6 गडी राखून पराभव, मालिकेत 1-1 अशी बरोबरी


कोहलीचा अनोखा विक्रम 


या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने 79 चेंडूंत 66 धावा केल्या. यासह त्याने वनडे क्रिकेटमध्ये तिसर्‍या क्रमांकावर खेळत 10,000 धावांचा आकडादेखील ओलांडला. अशी कामगिरी करणारा विराट कोहली हा जगातील दुसरा फलंदाज आहे. त्याच्या आधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने ही कामगिरी केली होती. पॉन्टिंगने तिसर्‍या क्रमांकावर 12,662 धावा केल्या आहेत.


याशिवाय कर्णधार म्हणून एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहलीने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथला मागे टाकलं आहे. स्मिथने 150 सामन्यात 5416 धावा केल्या. त्याचबरोबर कोहलीच्या नावावर आता 5442 धावा आहेत.


ऋषभ पंतच्या नावावर मोठा विक्रम


ऋषभ पंतने 40 चेंडूत 77 धावांची तुफानी खेळी केली. या दरम्यान त्याने सात षटकार ठोकले. पंत इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारा विकेटकीपर फलंदाज ठरला आहे. पंतने न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्युलम, दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डिकॉक आणि भारताचा महेंद्रसिंग धोनीला मागे सोडलं आहे. इंग्लंडविरुद्ध या तिघांनीही एका सामन्यात प्रत्येकी सहा षटकार लगावले आहेत.