India vs England 3rd Test: कर्णधार जो रूट (121 धावा) आणि डेव्हिड मलान (70 धावा) यांच्या जोरावर हेंडिग्ले येथे तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस पहिल्या डावात 8 बाद 423 पर्यंत इंग्लंडने मजल मारली. या सामन्यात इंग्लंडने 345 धावांची आघाडी घेतली आहे. स्टंपच्या वेळी क्रेग ओव्हरटनने 31 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 24 धावा केल्या तर ओली रॉबिन्सन खाते उघडल्याशिवाय क्रीजवर आहे. भारताकडून मोहम्मद शमीने तीन, तर मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकी दोन आणि जसप्रीत बुमराहला एक विकेट मिळाली.

Continues below advertisement


आज सकाळी इंग्लंडने बिनबाद 120 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. हसीब हमीदने 130 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 60 धावा आणि रोरी बर्न्सने 125 चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 52 धावा केल्या करत भागिदारी वाढवली. पण दोन्ही फलंदाज आज केवळ 15 धावा जोडू शकले. शमीने बर्न्सला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. बर्न्स 153 चेंडूत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 61 धावांवर बाद झाला.


यानंतर, हमीदने मालनसोबत डाव पुढे नेला. मात्र, जडेजाने हमीद बोल्ड करत या भागीदारीला फार काळ टिकू दिलं नाही. हमीद 195 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 68 धावांवर बाद झाला.


लंच ब्रेकनंतर मलान आणि रूटने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत शानदार फलंदाजी करत तिसऱ्या विकेटसाठी 139 धावांची भागीदारी केली. मात्र, सिराजने मलानला बाद करत भागीदारी संपवली. मलानने 128 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 70 धावा केल्या.


यानंतर जॉनी बेअरस्टोने रूटला चांगली साथ दिली आणि चौथ्या विकेटसाठी 52 धावा जोडल्या. मात्र, शमीने बेअरस्टोला बाद करत इंग्लंडला चौथा धक्का दिला. बेअरस्टोने 43 चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 29 धावा केल्या. त्यानंतर नव्या फलंदाजच्या रुपात आलेल्या जोस बटलरला (7) शमीने बाद केला.


भारतीय गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करण्यास मदत केली. पण दुसऱ्या बाजूनेपासून रूटने आपला डाव पुढे चालू ठेवला. बुमराहने रूटचा त्रिफळा उडवत इंग्लिश संघाला सर्वात मोठा धक्का दिला. रूटने 165 चेंडूत 121 धावांच्या खेळीत 14 चौकार मारले.


रूट बाद झाल्यानंतर जडेजाने मोईन अलीला (8) बाद करत इंग्लंडला सातवा धक्का दिला. त्यानंतर सिराजने स्टंप्स होण्याच्या काही वेळापूर्वी सॅम करेनला बाद केले, त्याने 30 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 15 धावा जमवल्या.