INDvsENG : पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा आठ विकेटने पराभव केला. इंग्लंडने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत केवळ 124 धावा केल्या. इंग्लंडने दोन विकेट गमावत हे लक्ष्य अवघ्या 15.3 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. या सामन्यात कोणत्या विक्रमांची नोंद झाली यावर एक नजर टाकुयात. 


भारताचे ओपनर्स पहिल्यांदा क्लीन बोल्ड


कालच्या सामन्यात भारताचा सलामीवीर केएल राहुल आणि शिखर धवन दोघेही क्लीन बोल्ड झाले. राहुलला जोफ्रा आर्चरने आणि धवनला मार्क वूडने बोल्ड केले. राहुलने या सामन्यात एक धाव, तर धवनने चार धावा केल्या. टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच दोन्ही भारतीय  ओपनर्स क्लीन बोल्ड झाले.


विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद 


इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. आदिल रशीदने त्याची विकेट घेतली. यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात कोहली शून्यावर बाद झाला होता. अशा प्रकारे तो कारकीर्दीत पहिल्यांदा सलग दोनदा शून्यावर बाद झाला आहे.


Ind vs Eng first T20 : इंग्लंडकडून पराभवाची परतफेड; 8 गडी राखत भारतावर मात


युजवेंद्र चहलच्या नावे मोठा विक्रम


टीम इंडियाचा लेगस्पिनर युझवेंद्र चहल या सामन्यात अत्यंत खराब गोलंदाजी केली. चहलने त्याच्या चार षटकांत 44 धावा देऊन एक विकेट घेतली. त्याने याा सामन्यात निराशजनक कामगिरी केली असली तरी त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नोंद झाला आहे. चहल आता टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक विकेट गोलंदाज ठरला आहे. या फॉरमॅटमध्ये चहलने आता 60 विकेट घेतल्या आहेत. त्याने जसप्रीत बुमराहला याबाबत मागे टाकले आहे. बुमराहच्या नावे टी-20 क्रिकेटमध्ये 59 विकेट आहेत.


INDvsENG 1st T-20 | इंग्लंडविरुद्ध विराट शुन्यावर बाद झाल्यानंतर उत्तराखंड पोलिसांचं ट्वीट चर्चेत


जोफ्रा आर्चर इंग्लंडच्या विजयाचा हिरो


इंग्लंडच्या या जबरदस्त विजयाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हिरो ठरला. त्याने आपल्या चार षटकांत एक मेडन टाकत केवळ 23 धावा दिल्या. तसेच तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. आर्चरला या कामगिरीमुळे मॅन ऑफ द मॅच म्हणूनही गौरवण्यात आले. तसेच इंग्लंडकडून जेसन रॉयने सर्वाधिक 49 धावा केल्या. याशिवाय जोस बटलरने 28, डेव्हिड मलनने नाबाद 24 आणि जानी बेअरस्टोने नाबाद 26 धावांचे योगदान दिले.