Ind vs Eng first T20 इंग्लंडच्या संघाला कसोटी मालिकेमध्ये नमवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ द्विगुणित आत्मविश्वासाह नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उतरला. पण, यावेळी मात्र संघ काहीसा मागे पडल्याचं पाहायला मिळालं.
टी20 सामन्यांच्या मालिकेमध्ये पहिल्याच सामन्यात नाणेफेक जिंकत पाहुण्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळं भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. फलंदाजीसाठी संघातील सलामीवीर खेळपट्टीवर येण्यापूर्वीच एक लक्षवेधी माहिती समोर आली.
सलामीच्या जोडीतून रोहित शर्मा याला वगळण्यात आलं. तिथं रोहितच्या अनुपस्थितीतच सलामीची जोडी खेळपट्टीवर आली आणि इंग्लंडच्या गोलंदाजीच्या माऱ्यापुढं एक एक करत संघातील खेळाडू माघारी परतू लागला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांच्या नाकी नऊ आणल्याचं पाहायला मिळालं.
संघाचा डाव गडगडत असतानाच श्रेयस अय्यरनं त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. त्याला यामध्ये साथ मिळाली ती म्हणजे खेळपट्टीवर दुसऱ्या टोकाला उभ्या असणाऱ्या हार्दीक पांड्याची. हार्दीक या सामन्यात भारताच्या धावसंख्येचा आकडा आणखी उंचावेल अशा क्रीडारसिकांच्या अपेक्षा होत्या. पण, त्यालाही प्रभावी कामगिरी करण्यात अपयश आलं. फलंदाजांची चुकेली दिशा पाहता आणि रोहितच्या अनुपस्थितीची जाणीव झालेल्या संघानं 20 षटकांमध्ये 124 धावा केल्या. परिणामी इंग्लंडच्या संघाला भारतानं 125 धावाचं आव्हान दिलं.
भारताचं आव्हान स्वीकारत मैदानात आलेल्या इंग्लंडच्या संघानं गोलंदाजीच्या बळावर सहजपणे गाठता येईल अशा आव्हानाचा पाठलाग सुरु केला. संयमी खेळी करत इंग्लंडच्या फलंदाजांनी अतिशय सहजपणे अवघे 2 गडी गमावत भारतीय संघाचा पराभव केला. Malanनं दमदार षटकारासह भारताला पराभवाच्या छायेत लोटलं. सोळाव्या षटकातच इंग्लंडच्या संघाने हे लक्ष्य गाठलं. त्यामुळे आता उर्वरित चार सामन्यांमध्ये भारताच्या कामगिरीवरच साऱ्यांचं लक्ष असणार आहे. टी20 मालिकेची विजयी सुरुवात करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. आता ही आघाडी कायम ठेवत खेळात सातत्य राखण्यात त्यांना यश मिळतं का, हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.