IND vs ENG 1st ODI Women Cricket : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडच्या महिला संघाचा सात विकेट्सनं पराभव केला आहे. गोलंदाजांच्या भेदक माऱ्यानंतर फलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघानं विजय मिळवला. इंग्लंड महिला संघानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात 227 धावांपर्यंत मजल मारली होती. भारतीय संघानं हे लक्ष तीन गड्यांच्या मोबदल्यात 44.2 षटकात पार केलं. या विजयासह भारतीय संघानं मालिकेत आघाडी घेतली आहे.
इंग्लंड महिला संघानं दिलेल्या 228 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शेफाली वर्मा अवघी एक धाव काढून तंबूत परतली होती. पण त्यानंतर स्मृती मंधानानं सर्व सुत्रे हातात घेतली. स्मृती मंधानानं झंझावाती 91 धावांची खेळी केली. यासिका भाटिया (50) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (74) यांनी स्मृती मंधानाला चांगली साथ दिली. विजय दृष्टीक्षेपात आल्यानंतर स्मृती मंधाना बाद झाली. इंग्लंडकडून केट क्रॉस सर्वात यशस्वी ठरली. केट क्रॉसनं दोन भारतीय फलंदाजांना बाद केलं.
त्यापूर्वी, हरमनप्रीत कौरनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या महिलांनी प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 227 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून डॅनिअल वॅट (43), अॅलिस डेव्हिडसन रिचर्ड्स (नाबाद 50) आणि सोफी एक्लेस्टोन (31) यांच्या खेळीमुळे इंग्लंडचा संघानं सन्माजनक धावसंख्या उभारली. भारताकडून दीप्ती शर्मानं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. त्याशिवाय झुलन गोस्वामीनं अचूक टप्प्यावर मारा केला. झुलन गोस्वामीनं 10 षटकात फक्त 20 धावा दिल्या. झुलन गोस्वामीनं दहा षटकात तब्बल 42 चेंडू निर्धाव फेकले.
भारतीय संघ
स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हरलीन देवोल, दिप्ती शर्मा, यस्तिका भाटिया, पुजा वस्त्रकर, स्नेह राणा, झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड, मेघना सिंह.
इंग्लंडचा संघ
एम्मा लॅम्ब, टॅमी ब्यूमॉन्ट, सोफिया डंकले, अॅलिस कॅप्सी, डॅनियल व्याट, एमी जोन्स, अॅलिस डेव्हिडसन रिचर्ड्स, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, केट क्रॉस, इस्सी वोंग