चेन्नई : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी चेन्नईमध्ये सुरु आहे. चेन्नई कसोटीचा दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजवला. भारताच्या पहिल्या डावातील 4, दुसऱ्या डावातील 3 आणि  बांगलादेशच्या पहिल्या डावातील 10 अशा एकूण 17 विकेट दुसऱ्या दिवशी गेल्या. भारताचा पहिला डाव 376 धावांवर आटोपला. तर, दुसऱ्या डावात भारतानं दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 बाद 81 धावा केल्या आहेत. विराट कोहलीला पहिल्या डावात चांगली कामगिरी करता आली नव्हती. मात्र, दुसऱ्या डावात विराट कोहलीनं चांगली सुरुवात केली होती.  त्यानं 37 बॉलमध्ये 17 धावा केल्या होत्या. विराट कोहलीला मेहेदी हसन मिराज यानं एलबीडब्ल्यू बाद केलं. विराट कोहलीच्या या विकेटवरुन आता तर्क वितर्क  सुरु झाले आहेत. 


विराट कोहलीनं डीआरएस घेतला असता तर...


विराट कोहली पहिल्या डावात केवळ 6 धावा करुन बाद झाला होता. त्यामुळं त्याच्याकडून दुसऱ्या डावात मोठ्या खेळीची अपेक्षा होती. विराट कोहलीनं त्यानुसार चांगली सुरुवात देखील केली होती. त्यानं 37 बॉलमध्ये 17 धावा केल्या होत्या. मात्र, मेहेदी हसन मिराज याच्या गोलंदाजीवर त्याला एलबीडबल्यू बाद देण्यात आलं. विराट कोहलीनं या निर्णयाविरोधात तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली नाही.  विराट कोहलीच्या विकेटचा रिप्ले पाहिला असता बॉल विराट कोहलीच्या बॅट जवळून जात असताना स्निकोमीटरमध्ये स्पाईक दिसून आला. यामुळं विराट कोहलीनं जर डीआरएस घेत तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली असती तर तो नाबाद राहिला ठरला असता, असा दावा क्रिकेट चाहत्यांनी केला आहे. 


भारताकडे मोठी आघाडी 


पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानावर दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभूत करत बांगलादेशनं विजय मिळवला होता. त्यानंतर भारतात कसोटी मालिका खेळण्यासाठी  बांगलादेशचा संघ भारतात आला. चेन्नई कसोटीत ते चागंली कामगिरी करतील अशी आशा सर्वांना होती. बांगलादेशच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत भारताला पहिल्या दिवशी जोरदार धक्के दिले होते. यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा यांच्या अर्थशतकाच्या आणि रवीचंद्रन अश्विनच्या शतकाच्या जोरावर भारतानं 376 धावा केल्या. तर, बांगलादेशला पहिल्या डावात भारताच्या गोलंदाजांनी 149 धावांवर रोखलं.  जसप्रीत बुमराहनं 4, आकाशदीप, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट घेत बांगलादेशला 149 धावांवर रोखलं.  भारतानं दुसऱ्या डावात तीन बाद 81 धावा केल्या आहेत. भारताकडे आता दुसऱ्या दिवस अखेर 308 धावांची आघाडी आहे. 


इतर बातम्या :