KL Rahul After India win : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN Test) यांच्यात खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने (Team India) दोन्ही सामने जिंकत 2-0 असा विजय मिळवला. बांगलादेशविरुद्धचा दुसरा सामना 3 गडी राखून जिंकून बांगलादेशविरुद्ध एकही कसोटी सामना न गमावण्याचा विक्रमही संघाने कायम राखला. दरम्यान रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने संघाचे नेतृत्व केएल राहुल (Captain KL Rahul) करत होता, ज्यामुळे मालिका जिंकल्यानंतर त्याने आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी सामना रंगात आला असताना ड्रेसिंग रुममध्ये फारच टेन्शनचं वातावरण होतं, असं त्याने सांगितलं.


सामन्यानंतर बोलताना केएल राहुल (KL Rahul) म्हणाला, “कसोटी सामना जिंकण्यासाठी मधल्या फळीतील खेळाडूंवर तुम्ही विश्वास ठेवता. आम्ही सामना जिंकू असं आम्हाला वाटत होतं, पण मी खोटं बोलणार नाही, ड्रेसिंग रूममध्ये एक वेळ अशी आली होती जेव्हा खूप टेन्शन वाढलं होतं. फलंदाजी करणं अवघड झालं होतं, दोन्ही डावात समोरच्या संघाने आमच्यावर दबाव आणला. आम्ही काही विकेट गमावल्या पण अखेर लक्ष्य गाठत आम्ही सामना जिंकला.''


संपूर्ण मालिकेत राहुल फ्लॉप


या संपूर्ण मालिकेत केएल राहुल खराब फॉर्मात दिसला. दोन्ही सामन्यांच्या एकूण 4 डावात त्याने 57 धावा केल्या. कर्णधार म्हणून त्याची कामगिरी चिंताजनक आहे. केवळ या मालिकेतच नाही तर यावर्षी कसोटीतही त्याच्या बॅटमधून केवळ 17.12 च्या सरासरीने धावा निघाल्या आहेत. राहुलने यावर्षी 4 सामन्यांच्या 8 डावात केवळ 137 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून फक्त एक अर्धशतकं झळकलं आहे.


भारताने मालिका 2-0 ने जिंकली


भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दोन्ही सामने जिंकत भारताने क्लिन स्वीप दिला आहे. यावेएळी पहिला कसोटी सामना चितगाव येथे खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने यजमान बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला. तर दुसरा सामना फारच अटीतटीचा झाला. भारताला शेवटच्या डावात 145 धावांचे माफक लक्ष्य असतानाही 7 गडी गमावून भारत जिंकला आणि तीन विकेट्च्या फरकाने सामना जिंकत भारताने मालिका जिंकली.


हे देखील वाचा-