IND vs BAN : भारत विरुद्ध बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा स्टार ऑलराऊंडर शाकिब अल् हसनने (Shakib Al hasan) तब्बल 5 विकेट्स घेत अफलातून अशी गोलंदाजी केली आहे. त्याच्या या कमाल गोलंदाजीमुळे भारत 186 धावांवर सर्वबाद झाला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली. वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर आणि दीपक चाहर अशा महत्त्वाच्या खेळाडूंची विकेट घेतली.
विशेष म्हणजे या कामगिरीसह शाकिबने एक खास रेकॉर्ड आपल्या नावे केला असून भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 5 विकेट्स घेणारा तो पहिला बांगलादेशी फिरकीपटू बनला आहे. तसंच एकदिवसीय क्रिकेट इतिहासात भारताविरुद्ध 5 विकेट्स घेणारा तो 8 वा फिरकिपटू ठरल्यामुळे त्याने दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. शाकिबच्या आधी मुश्ताक अहमद, सकलेन मुश्ताक, मुथय्या मुरलीथरन, ऍशले जाइल्स, अजंथा मेंडिस, सईद अजमल आणि अकिला धनंजया या स्टार फिरकिपटूंनी ही कमाल केली होती.
केएलची एकहाती झुंज
शाकिबने अप्रतिम गोलंदाजी करत भारताचे महत्त्वाचे विकेट्स घेतले असले तरी एक स्टार फलंदाज त्याच्या जाळ्यात अडकू शकला नाही. तो म्हणजे केएल राहुल. राहुलने सामन्यात एकहाती झुंज देत 73 धावा केल्या. ज्यामुळे भारत किमान 186 धावांपर्यत पोहचू शकला. इतर फलंदाजांचा विचार करता, सलामीवीर शिखर आणि रोहित अनुक्रमे 7 आणि 27 धावा करुन बाद झाले. विराटही 9 धावांवर एका अप्रतिम कॅचचा शिकार झाला. त्यानंतर श्रेयस आणि केएल यांनी काही काळ डाव सावरला. पण श्रेयस 24 धावा करुन बाद झाला. मग वॉशिंग्टन सुंदरही 19 धावा करुन तंबूत परतला. दुसऱ्या बाजूने केएल राहुलने एकहाती झुंज कायम ठेवत अर्धशतक पूर्ण केलं. पण त्यानंतर खालच्या फळीतील फलंदाज दुहेरी संख्याही गाठू शकले नाहीत. अखेर 186 धावांवर भारतीय संघ सर्वबाद झाला. राहुलने 70 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार ठोकत 73 धावा केल्या.
हे देखील वाचा-