India vs Bangladesh World Cup 2023 : आज पुण्याच्या मैदानावर भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये अटीतटीचा सामना होणार आहे. या सामन्याआधी विराट कोहलीची चर्चा सुरु आहे. त्याला कारण, बांगलादेशचा विकेटकीपर फलंदाज मुशफिकुर रहीम आहे. विराट कोहली याच्यासोबत स्लेजिंग नको... तो स्लेजिंग केल्यास एकही संधी सोडत नाही, अशी प्रतिक्रिया मुशफिकुर रहीम याने दिली आहे. तो स्टार स्पोर्ट्सशी बोलत होता. रहीमच्या या वक्तव्याची सध्या सोशळ मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.


जगभरातील अनेक खेळाडूंना स्लेजिंग करायला आवडते. स्लेजिंगमुळे ते उत्साहात येतात. त्यांचा खेळ अधिक उंचावतो. त्यामुळेच आतापर्यंत विराट कोहलीला मी कधीच स्लेजिंग केले नाही. कारण, स्लेजिंग केल्यानंतर विराट कोहलीचा उत्साह अधिक वाढतो अन् तो अधिक आक्रमक होऊन खेळतो. मी आमच्या गोलंदाजांना नेहमी सांगतो, विराट कोहलीला जितक्या लवकर बाद करता येईल, तेवढं चांगलं आहे, असे रहीम म्हणाला.


मुशफिकुर रहीम म्हणाला,  जेव्हा मी विराट कोहलीविरुद्ध खेळलो आहे, तेव्हा त्याने मला नेहमी स्लेज केले आहे. विराट खूपच प्रतिस्पर्धी क्रिकेटपटू आहे. त्याला पराभव आवडत नाही. मला त्याच्यासोबतची प्रतिस्पर्धा आवडते. तसेच, भारत आणि त्याचा सामना करण्यात जे आव्हान मिळते, तेही खूप आवडते.


विराट कोहलीचा बांगलादेशविरोधात धावांचा पाऊस - 


विराट कोहली विश्वचषकात भन्नाट फॉर्मात आहे. तीन सामन्यात त्याने दोन अर्धशतके ठोकली आहे. पुण्यात आणि बांगलादेशविरोधात विराट कोहलीचा रेकॉर्ड चांगला आहे. विराट कोहलीने बांगलादेशविरोदात 15 वनडे सामने खेळले आहे. विराट कोहलीने 4 शतके आणि तीन अर्धशतकासह 807 धावा चोपल्या आहेत. बांगलादेशविरोधात विराट कोहलीची सर्वोच्च धावंसख्या 136 आहे. त्याची सरासरी 67.25 इतकी जबराट आहे.  मुशफिकुर रहीम याची भारताविरोधातील कामगिरी सरासरी राहिली आहे. त्याने 25 सामन्यात 665 धावा चोपल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 117 इतकी आहे.  


आज भारताला नंबर एक होण्याची संधी -


पुण्यात आज भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये लढत होणार आहे. या लढतीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. पुण्याच्या मैदानावर भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. बांगलादेशला मोठ्या फरकाने पराभूत करत भारताला गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज करण्याची संधी आहे. भारतीय संघाने विश्वचषकाच्या तीन सामन्यात तीन विजयासह दुसरे स्थान पटकावले आहे. आज बांगलादेशी टायगरचा परभाव करत पुन्हा अव्वल स्थान काबिज करण्याची टीम इंडियाकडे संधी असेल. विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा पुण्याच्या मैदानावर चांगला रेकॉर्ड आहे.