Ind vs Aus 3rd T20: सिडनी येथे खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 12 धावांनी पराभव केला. याचसोबत तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेऊन मालिका विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 187 धावांचं लक्ष ठेवलं होतं. त्या लक्षाचा पाठलाग करताना भारतीय संघ 20 षटकात 174 धावाच करु शकला.


या मालिकेत शानदार खेळी खेळणाऱ्या हार्दिक पांड्याला मॅन ऑफ द सीरीजचा पुरस्कार देण्यात आला तर तिसऱ्या सामन्यात तीन बळी घेणाऱ्या मिशेल स्वेप्सनला याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.


भारताचा कर्णधार विराट कोहलीने 61 चेंडूत 85 धावांची शानदार खेळी केली. यामध्ये त्याने 4 चौकार आणि तीन षटकार लावले. परंतु त्याची ही खेळी टीम इंडियाला विजय प्राप्त करुन देऊ शकली नाही. या व्यतिरिक्त शिखर धवनने 28 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या वतीने मिशेल स्वेप्सन याने सर्वाधिक म्हणजे 3 बळी घेतले तर ग्लेन मॅक्सवेल, सीन अॅबॉट आणि अॅडम झेम्पा यांनी प्रत्येकी एक बळी घेतले.


टॉस जिंकल्यानंतर भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडने 53 चेंडूत 80 धावांची धडाकेबाज खेळी केली. ग्लेन मॅक्सवेलने 36 चेंडूत 54 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 3 चौकार आणि 3 षटकार लावले. वेड आणि मॅक्सवेलने तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. भारताकडून वॉशिग्टन सुंदर याने दोन बळी घेतले तर शार्दुल ठाकुर आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी एक बळी घेतले.