सिडनी : सिडनी क्रिकेट गाऊंडवर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सामना रंगला असतानाच अचानक प्रेक्षकांचं लक्ष दुसरीकडे गेलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वन डे सामन्यात एक सुंदर घटना कॅमेऱ्यात कैद झाली. एकीकडे मैदानावर क्रिकेटचा सामना सुरु होता, त्याचवेळी प्रेक्षकांमध्ये असलेल्या एका भारतीय तरुणाने त्याच्या ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेण्डला प्रपोज केलं आणि तिनेही होकार दिला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.


या भारतीय तरुणाने गुडघ्यावर बसून आपल्या गर्लफ्रेण्डला प्रपोज केलं आणि तिला अंगठी घातली. यानंतर तरुणीनेही होकार दिला. यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दोघांचं अभिनंदन केलं.


मॅक्सवेलकडूनही अभिनंदन
मैदानात लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर हा प्रपोजचा क्षण पाहून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मैक्सवेलनेही टाळ्या वाजवून दोघांचं अभिनंदन केलं.


Ind vs Aus, 2nd ODI : ऑस्ट्रेलियाकडून दुसर्‍या वनडे सामन्यातही भारताचा धुव्वा, 51 धावांनी विजय मिळवत मालिका जिंकली


भारतीय डावाच्या 20व्या षटकातील घटना
स्टेडियममध्ये प्रपोज करण्याची ही घटना भारतीय डावाच्या 20व्या षटकात कैद झाली. त्यावेळी भारतीय संघाने दोन विकेट्सच्या मोबदल्यात 126 धावा केल्या होत्या. कर्णधार विराट कोहली 35 आणि श्रेयस अय्यर 30 धावा करुन क्रीजवर होते.





यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबदरस्त व्हायरल झाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या डिजिटल टीमनेही आपल्या ट्विटर हॅण्डलवरही हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, हा आजचा सर्वात कठीण खेळ होता? यानंतर युझर्सनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. एकाने म्हटलं की सामन्यातील एक चांगला क्षण तर दुसऱ्याने म्हटलं की हा सामना तर भारतानेच जिंकला.


दुसर्‍या सामन्यातही भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली
दरम्यान फलंदाजांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या वन-डे सामन्यात भारताला 51 धावांनी पराभूत केले. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. फॉर्ममध्ये असलेल्या स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून 64 चेंडूत शतक झळकावले. याच खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विक्रमी 389 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ निर्धारित षटकांत केवळ 9 गड्यांच्या बदल्यात 338 धावा करु शकला.