IND vs AUS, Delhi Test : भारतीय संघाने (Team India) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 स्पर्धेची ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने नागपुरात (Nagpur Test) खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. आता या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Delhi Cricket Stadium) खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी कसोटी फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा आतापर्यंतचा विक्रम अगदी दमदार राहिला आहे. दिल्लीच्या मैदानात भारताने एकूण 34 टेस्ट सामने खेळले असून यामधील 13 सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे टीम इंडियाला शेवटचा पराभव 1987 मध्ये वेस्टइंडीजकडून मिळाला होता.


दिल्लीत खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व स्पष्टपणे पाहायला मिळाले. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी काळ्या मातीची असल्याने येथे चेंडूला फारशी उसळी मिळणं अपेक्षित नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजांचा सामना करणं पुन्हा एकदा कांगारू संघासाठी मोठी समस्या बनू शकते. दिल्लीच्या मैदानावर टीम इंडियाचा कसोटी विक्रम पाहिला तर गेल्या 36 वर्षांपासून येथे कोणताही विरोधी संघ विजय मिळवू शकलेला नाही. कायम भारतच जिंकला आहे. 2017 मध्ये या मैदानावर शेवटचा कसोटी सामना श्रीलंकेविरुद्ध भारताने खेळला होता. या सामन्यात विराट कोहलीने 243 धावांची शानदार खेळी केली होती. मात्र, नंतर हा कसोटी सामना अनिर्णित राहिला. आतापर्यंत, भारतीय संघाने दिल्लीच्या मैदानावर एकूण 34 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 13 सामने जिंकले आहेत, तर भारताला 6 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. 1987 साली या मैदानावर टीम इंडियाला शेवटच्या वेळी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता.


दिल्लीत ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड खराब


जर  दिल्लीच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियन संघाच्या रेकॉर्डचा विचार केला तर, त्यांनी येथे आतापर्यंत एकूण 7 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांना फक्त एक सामना जिंकता आला आहे. 1959 च्या दौऱ्यावर या मैदानावर कांगारू संघाने भारतीय संघाचा एक डाव आणि 127 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर त्यांना 3 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले तर 3 सामने अनिर्णित राहिले. 2013 च्या दौऱ्यात कांगारू संघाने या मैदानावर शेवटचा कसोटी सामना खेळला होता, ज्यामध्ये त्यांना 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.


हे देखील वाचा-