IND vs AUS, Shreyas Iyer ruled out from 2nd test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका सुरु आहे. नागपुरात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला. या विजयाची चर्चा सुरु असतानाच टीम इंडियाच्या चिंतेत वाढ होणारी बातमी समोर आली आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यर पुनरागमन करु शकणार नाही. कारण, श्रेयस अय्यर अद्याप तंदुरुस्त नाही. पूर्णपणे फिट नसल्यामुळे श्रेयस अय्यर दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे.
श्रेयस अय्यर दुसऱ्या कसोटीतून बाद -
17 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना होणार आहे. या सामन्यात स्टार फलंदाज श्रेयस अय्यर खेळू शकणार नाही. तो दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे अय्यरला दुसऱ्या कसोटी सामन्यालाही मुकावं लागणार आहे. अय्यरच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे.
बुमराह कधी करणार पुनरागमन ?
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दलही मोठी अपडेट समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराह बॉर्डर गावस्कर मालिकेला मुकणार आहे. त्याशिवाय तो आयपीएलमध्येही खेळण्याची शक्यता नाही. बुमराह अद्याप पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे त्याला आणखी काही वेळ संघाबाहेर बसावं लागणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला कसोटी सामना- भारताने जिंकला आहे. 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरा कसोटी सामना- 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली
तिसरा कसोटी सामना- 1 ते 5 मार्च, इंदूर
चौथा कसोटी सामना - 9 ते 13 मार्च, अहमदाबाद
याशिवाय भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 17 मार्चपासून तीन एकदिवसीय सामन्याची मालिका होणार आहे.
फिरकीच्या जाळ्यात अडकले कांगारु -
पहिल्या कसोटी सामन्यात रविंद्र जाडेजा आणि आर अश्विन यांच्या फिरकीच्या जाळ्यात ऑस्ट्रेलियाचा संघ अडकला होता. दुसऱ्या डावात तर ऑस्ट्रेलियाच्या संघाला 100 धावांचा पल्लाही पार करता आला नाही. पहिल्या डावात जाडेजाने तर दुसऱ्या डावात अश्विन याने भेदक मारा केला होता. भारताने नागपूरात झालेला हा सामना 1 डाव आणि 132 धावांच्या फरकाने जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.