INDvsAUS : टीम इंडियाने बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 गडी राखून शानदार विजय मिळवला. मात्र तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल करू शकते. तिसर्‍या कसोटीपूर्वी उमेश यादवच्या रुपाने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे उमेश यादव तिसर्‍या कसोटीतून बाहेर पडला आहे. बॉक्सिंग डे कसोटीमध्ये गोलंदाजी करताना उमेश यादवला दुखापत झाली. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर मर्यादित षटकांत एकदिवसीय आणि टी -20 सामन्यात पदार्पण करणारा तमिळनाडूचा डावखुरा गोलंदाज टी नटराजनला तिसर्‍या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता आहे.


आयपीएल 2020 मध्ये टी नटराजनने शानदार गोलंदाजी करून सर्वांना प्रभावित केले. यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याने एकदिवसीय आणि टी -20 सामन्यात पदार्पण करून आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आणि सर्वांची मने जिंकली. टी नटराजन तिसर्‍या कसोटीत आपली पहिली कसोटी कॅप मिळवू शकतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी 2021 पासून सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) खेळला जाईल. मेलबर्न क्रिकेट मैदानावरची दुसरी कसोटी भारताने आठ विकेट्सने जिंकली आणि मालिका 1-1अशी बरोबरीत आणली आहे.



इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यॉर्कर स्पेशालिस्ट नटराजनने एकदिवसीय पदार्पण सामन्यात 70 धावा देऊन 2 बळी घेतले आणि त्यानंतर 6.91 च्या सरासरीने तीन सामन्यांच्या टी -20 मालिकेत 6 विकेट घेतल्या. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत उमेश यादवच्या जागी टी नजराजनला संधी मिळू शकते. दुसर्‍या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराज आणि शुभमन गिलने पदार्पण करुन सर्वांना प्रभावित केले.


रोहित शर्मा तिसरा कसोटी खेळू शकतो


तिसर्‍या कसोटी सामन्यापूर्वी रोहित शर्माला फिटनेस टेस्ट पास करावी लागणार आहे. रोहित शर्मा, मयांक अगरवालची जागा घेऊ शकतो. मयांक अगरवाल आतापर्यंत कसोटी मालिकेत फॉर्मात दिसला नाही. जर रोहित फिट असेल तो ओपनिंगला उतरु शकेल.