IND vs AUS, 2nd Test | भारतीय क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव केला. आठ गडी राखत भारतीय संघानं ही विजयी पताका रोवत मालिकेत बरोबरी साधली. संघाची एकजूट, संयमी खेळी आणि प्रभावी नेतृत्त्वं याच्याच बळावर संघाला ही कामगिरी करता आली.


सामन्यातील प्रभावी खेळीसाठी क्रीडा वर्तुळासह सर्वच क्षेत्रांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. यावेळी सामन्यातील विजयानंतर (Ajinkya Rahane) अजिंक्य रहाणेनं प्रतिक्रिया देतानाही सर्वांचीच मनं जिंकली.


ऑस्ट्रेलियावर मात करण्याचं श्रेय यावेळी अजिंक्यनं संघातील नवोदित खेळाडूंना दिलं. 'सिराज आणि गिल या नवोदित खेळाडूंना मी या विजयाचं श्रेय देऊ इच्छितो. अॅडिलेट कसोटी सामन्यातील पराभवानंतर संपूर्ण संघानंच प्रशंसात्मक खेळीचं प्रदर्शन केलं', असं रहाणे म्हणाला. उमेश यादव दुखापतग्रस्त झाल्यामुळं त्याला दुसऱ्या डावात खेळता आलं नाही. अशावेळी खेळात दृष्टीकोन असणं महत्त्वाचा असल्याची बाब त्यानं अधोरेखित केली.


संघात पाच गोलंदाजांचा समावेश करण्याची रणनिती फायद्याची ठरली, असं म्हणत जडेजाच्या पाठीवरही त्यानं शाबासकीची थाप दिली. या सामन्याच्या निमित्तानं शुभमन गिल यानं आपल्याच खेळाचा स्तर उंचावल्याचं म्हणत त्याच्या आत्मसंयमी वृत्तीला रहाणेनं दाद दिली.





एक खेळाडू म्हणून त्यानं जितकी समर्पक खेळी दाखवली तितकाच एक जबाबदार कर्णधार म्हणून तो सर्वांसमोर आला. संघाच्या याचा कामगिरीबाबत आणि रहाणेच्या नेतृत्वाबाबत प्रतिक्रिया देत अनेक माजी खेळाडूंनीही आपले विचार मांडले. यात लक्ष वेधून गेली ती म्हणजे सध्याच्या संघाच्या कर्णधारपदाची धुरा रहाणेवर सोपवून भारतात परतलेल्या विराट कोहली याची प्रतिक्रिया. विराटनं संघातील सर्वच खेळाडूंना शाबासकी देत कर्णधार म्हणून त्यानं उत्तम कामगिरी बजावल्याचं सांगितलं.