Test Cricket Records : सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) चार कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळवला गेला, ज्यामध्ये टीम इंडियाने एका मोठ्या विजयाची नोंद केली. संघाच्या या विजयात कर्णधार रोहित शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली. रोहित शर्माने 15 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 120 धावांची खेळी केली. रोहितच्या या खेळीमुळे टीम इंडियाला 400 धावांचा पल्ला गाठण्यात मोठा फायदा झाला. विशेष म्हणजे रोहित शर्मा दीर्घकाळापासून कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. 2019 पासून तो टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करताना दिसत आहे. तेव्हापासून त्याने 6 कसोटी शतकं आणि 4 अर्धशतकं त्याने केली आहेत. त्याचवेळी त्याची सरासरीही चांगली दिसत आहे. ज्यामुळे तो कसोटी क्रिकेटमधील फलंदाजांमध्ये टॉप रँकवर दिसत आहे.
रोहित शर्माने 2019 पासून कसोटी क्रिकेटमध्ये 57.65 च्या सरासरीने किमान 1000 धावा केल्या आहेत. या सरासरीसह रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधील पाचव्या क्रमांकाचा सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडचा केन विल्यमसन 63.57 च्या सरासरीसह पहिल्या स्थानावर आहे.
2019 पासून सर्वोत्तम कसोटी सरासरी असलेले फलंदाज (किमान 1000 धावा)
- केन विल्यमसन - 63.57 ची सरासरी.
- मार्नस लबुशेन - सरासरी 61.47.
- स्टीव्ह स्मिथ - सरासरी 59.76.
- बाबर आझम - सरासरी 57.88.
- रोहित शर्मा - सरासरी 57.65.
आतापर्यंत रोहित शर्माची कसोटी कारकीर्द
नोव्हेंबर 2013 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या रोहित शर्माने आतापर्यंत एकूण 46 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 78 डावांमध्ये त्याने 47.20 च्या सरासरीने 3257 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 9 शतक आणि 14 अर्धशतकं केली आहेत. त्याच वेळी, त्याची सर्वोच्च धावसंख्या 212 आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकत शर्माच्या नावावर खास विक्रमाची नोंद
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात झालेल्या कसोटी सामन्यात कॅप्टन रोहित शर्माने शतक झळकावताच एक खास विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (ODI, Test आणि T20) शतक झळकावणारा तो पहिला भारतीय कर्णधार (Team India Captain) ठरला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये केवळ चार खेळाडूंना ही कामगिरी करता आली आहे. रोहितपूर्वी पाकिस्तानचा बाबर आझम, श्रीलंकेचा दिलशान आणि दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिस यांनी हा पराक्रम केला आहे. दरम्यान रोहितने शतक झळकावताच मैदानात उपस्थित सर्वांनीच त्याचं टाळ्या वाजवून कौतुक केलं.
हे देखील वाचा-