ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या तिसऱ्या कसोटीला आज सुरुवात झाली आहे. तिसरी कसोटी ब्रिस्बेनच्या गाबा क्रिकेट ग्राऊंडवर आजपासून सुरु झाली. मात्र, आजचा पहिला दिवस पावसामुळं वाया गेला. भारत आणि  ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ केवळ 13.2 ओव्हर इतका झाला. ऑस्ट्रेलियानं या दरम्यान बिनबाद 28 धावा केल्या. उस्मान ख्वाजानं  19 आणि नॅथन मॅकस्विनी यानं 4 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ पावसानं वाया गेल्यानं प्रेक्षकांची निराशा झाल्याचं देखील पाहायला मिळालं. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या एका निर्णयानं प्रेक्षकांना दिलासा मिळाला आहे. 


क्रिकेट ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा 


क्रिकेट ऑस्ट्रेलियानं मोठी घोषणा केली असून पहिल्या दिवसाची  ज्या प्रेक्षकांकडे तिकिटं असतील त्यांना संपूर्ण रक्कम परत केली जाणार आहे.क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या रिफंड पॉलिसी नुसार एखाद्या दिवसात 15 ओव्हरपेक्षा कमी ओव्हरचा खेळ झाल्यास  किंवा मॅचचा निकाल काहीच न लागल्यास प्रेक्षकांना तिकिटाची रक्कम परत केली जाते. 


मॅचचा दुसऱ्या दिवसाचा वेळ बदलला 


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 5.50 ला सुरु झाला. मात्र, दुसऱ्या दिवसाचा खेळ अर्धा तास अगोदर सुरु होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ट्वीट करुन या संदर्भातील माहिती दिली आहे.  ब्रिस्बेनमधील पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळं रोखण्यात आला. उद्या स्थानिक प्रमाण वेळेनुसार सकाळी  9.50 म्हणजेज भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 5.20  मिनिटांनी खेळ सुरु होईल. दुसऱ्या दिवशी किमान 98 ओव्हरचा खेळ होणं अपेक्षित आहे. 



ब्रिस्बेनचं वातावरण कसं राहणार?


14 डिसेंबरला ब्रिस्बेन सकाळपासून ढगाळ वातावरण दिसून आलं. दिवसभरात 66.2 मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार पाऊस आला. रविवारी 50 टक्के पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात  आली आहे. पुढील काही दिवस ब्रिस्बेनमध्ये पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं तिसऱ्या कसोटीत पावसामुळं अनेकदा व्यत्यय येऊ शकतो. 


दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियानं पाच सामन्यांच्या मालिकेत प्रत्येकी एक एक मॅच जिंकली आहे. दोन्ही संघ मालिकेत सध्या बरोबरीत आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीनं उर्वरित कसोटी सामने महत्त्वाचे आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत जायचं असल्यास भारताला राहिलेले कसोटी सामने जिंकणं आवश्यक आहे. 


इतर बातम्या : 


India vs Australia 3rd Test : गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?