Australia vs India, 4th Test Day 4 : मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी जबरदस्त रोमांचक मोडवर आली आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात महत्त्वाची आघाडी मिळाली आहे, त्यामुळे त्यांची पकड भारताच्या तुलनेत थोडी मजबूत असल्याचे दिसून येत आहे. आज भारताचा पहिला डाव 369 धावांवर आटोपला आणि पहिल्या डावातील धावसंख्येच्या आधारे ऑस्ट्रेलियाला 105 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने 25 षटकांत 53/2 धावा केल्या असून त्यांची एकूण आघाडी 157 धावांची झाली आहे. स्टीव्ह स्मिथ 2 धावांसह तर मार्नस लॅबुशेन 20 धावांसह नाबाद आहे. या सत्रात 28.3 षटके खेळली गेली, ज्यामध्ये 3 गडी गमावून 64 धावा झाल्या.
नॅथन लायनने केली नितीश रेड्डीची शिकार
आज टीम इंडियाने नऊ विकेट्सवर 358 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली आणि 11 धावांची भर घालता आली. आज सकाळी नितीश रेड्डी मोहम्मद सिराजसह जास्तीत जास्त धावा जोडेल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. सिराजने आपली विकेट राखली पण दुसऱ्या टोकाकडून वेगवान धावा करण्याचा प्रयत्न करत असताना नितीश रेड्डी बाद झाला. त्याला नॅथन लायनने त्याला आऊट केले. अशाप्रकारे भारताचा डाव 119.3 षटकात 369 धावांवर आटोपला. नितीशने 189 चेंडूत 114 धावा केल्या, ज्यात 11 चौकार आणि एक षटकार आहे. तर सिराज 4 धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स, स्कॉट बोलँड आणि नॅथन लायन यांनी डावात प्रत्येकी तीन बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांची जबरदस्त सुरुवात
दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर सॅम कॉन्स्टासला जास्त काळ टिकण्याची संधी दिली नाही आणि त्याला क्लीन बोल्ड केले. त्याला सातव्या षटकात पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कॉन्स्टासच्या बॅटमधून फक्त 8 धावा आल्या. तर त्याचा साथीदार उस्मान ख्वाजा डावाच्या सुरुवातीला यशस्वी जैस्वालने दिलेल्या लाइफलाइनचा फायदा घेऊ शकला नाही आणि केवळ 21 धावा करून तो मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर आऊट झाला. अशा प्रकारे भारताने ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांना आऊट केले. ऑस्ट्रेलियन कॅम्पला आशा आहे की स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेनची जोडी दुसऱ्या सत्रात मोठी भागीदारी करेल, जेणेकरून यजमान संघ भारताविरुद्ध मोठे लक्ष्य ठेवण्याच्या दिशेने वाटचाल करू शकेल.
हे ही वाचा -