Australia vs India 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील तिसरा कसोटी सामना आजपासून (14 डिसेंबर) ब्रिस्बेनमधील गाबा येथे सुरू झाला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने आपल्या प्लेइंग 11 मध्ये 2 महत्त्वाचे बदल केले आहेत. रवींद्र जडेजा आणि आकाश दीप यांचा संघात जागा मिळाली आहे, तर रविचंद्रन अश्विन आणि हर्षित राणा यांना वगळण्यात आले आहे.






नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की. "थोडे ढगाळ आहे आणि खेळपट्टीवर जास्त गवत आहे, त्यामुळे आम्हाला परिस्थितीचा सर्वोत्तम उपयोग करायचा आहे. दोन्ही संघांनी गेल्या दोन सामन्यात चांगले क्रिकेट खेळले आहे. आमच्यासाठी हा मोठा सामना आहे, आमच्याकडून जे अपेक्षित आहे ते आम्ही करू. आम्ही चांगले क्रिकेट खेळू, आम्हाला समजते की आम्हाला काही संधींचा फायदा घ्यायचा आहे, आम्ही गेल्या सामन्यात असे केले नाही त्यामुळे आम्ही हरलो. खेळाडू सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, आम्ही येथे येऊन खेळण्यासाठी उत्सुक आहोत.


अश्विनच्या जागी जडेजा का आला?






ॲडलेड कसोटीत आर अश्विनकडून खूप अपेक्षा होत्या, पण तो काही विशेष करू शकला नाही. त्याने पहिल्या डावात 18 षटके टाकली, 53 धावांत 1 बळी घेतला. दुसऱ्या डावात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. फलंदाजीच्या जोरावर त्याने पहिल्या डावात 22 आणि दुसऱ्या डावात 7 धावांचे योगदान दिले. त्यामुळे रोहितने आता रवींद्र जडेजावर विश्वास व्यक्त केला आहे.


दुसरीकडे, पर्थमध्ये आपली छाप सोडणारा हर्षित राणा ॲडलेडमध्ये निस्तेज दिसत होता. आता त्याची जागा आकाश दीपने घेतली आहे, ज्याने अलीकडच्या काळात कसोटीत चमकदार गोलंदाजी केली आहे. त्याच्या गोलंदाजी कौशल्याची तुलना मोहम्मद शमीशी केली जाते. गाबाची विकेट वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरणार आहे. अचूक लाइन-लेंथ असलेल्या गोलंदाजांना या विकेटवर यश मिळण्याची अपेक्षा आहे.  


टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.


ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन : उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स (सी), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन