Australia vs India 2nd Test : मिचेल स्टार्कच्या घातक गोलंदाजीसमोर ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय शेर 180 धावांवर डेर झाले. मिचेल स्टार्कच्या वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाज जास्त काळ विकेटवर टिकू शकले नाहीत. ना जैस्वाल, ना कोहली, ना कर्णधार रोहित शर्माची बॅट चालली. नितीश रेड्डीने सर्वाधिक 42 धावा केल्या तर केएल राहुलने 37 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या. त्याची कसोटी कारकिर्दीतील हा पंधरावा पंजा आहे. कमिन्स आणि बोलंडने 2-2 विकेट घेतल्या.
टीम इंडियाची सुरुवात खराब
पिंक बॉल कसोटीत भारताची सुरुवात खूपच खराब झाली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने पहिल्याच चेंडूवर पहिली विकेट गमावली. पर्थ कसोटीत शतकवीर यशस्वी जैस्वालला ॲडलेडमध्ये खातेही उघडता आले नाही. यशस्वी जैस्वालला पहिल्याच चेंडूवर मिचेल स्टार्कने एलबीडब्ल्यू केले. यानंतर दुसरे सलामीवीर केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी डावाची धुरा सांभाळली. दोघांनी 69 धावांची भागीदारी केली. भारत चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे असे वाटत असतानाच विकेटची माळ सुरू झाली.
केएल राहुल (37) बाद होणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरला. स्टार्कच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. चौथ्या क्रमांकावर आलेला विराट कोहली 7 धावा करून बाद झाला. मिचेल स्टार्कनेही त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर काही वेळातच स्कॉट बोलँडच्या चेंडूवर शुभमन गिलही चालता केला.
रोहित शर्मा आणि ऋषभ पंत ही फेल
पहिल्या सत्रानंतर म्हणजेच डिनर ब्रेकनंतर भारताची धावसंख्या 4 विकेटवर 82 धावा होती. दुसऱ्या सत्रात रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनी जबाबदारी स्वीकारली. पण ही जोडी फार काळ क्रीझवर टिकली नाही. शुभमननंतर स्कॉट बोलंडनेही रोहित शर्माला आपला शिकार बनवले. रोहितलाही एलबीडब्ल्यू झाला. काही वेळाने ऋषभ पंतलाही लॅबुशेनने झेलबाद केले. पंत बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 109 धावा होती.
शेवटी नितीश रेड्डीचा तडाखा
यानंतर अश्विनने नितीश रेड्डीसोबत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि सातव्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी केली. स्टार्कने पुन्हा एकदा अडचणीत आणले आणि अश्विनला 22 धावांवर आऊट केले. हर्षित राणा आणि जसप्रीत बुमराह खाते न उघडताच बाद झाले. नितीश रेड्डी स्टार्कचा सहावा बळी ठरला. तो शेवटी 54 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 42 धावा करून आऊट झाला.