IND vs AUS 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात दिल्लीत सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवलाय. गावस्कर बॉर्डर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सनं विजय मिळवला आहे. दिल्ली कसोटी जिंकत भारतानं सिरिजमधे 2-0 नं आघाडी घेतली आहे. हा भारतीय संघाचा ऐतिहासीक विजय आहे. कारण गेल्या 63 वर्षांपासून दिल्लीत टीम इंडियावर मात करणं कांगारूंना शक्य झालेलं नाही. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा हे या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. 


दिल्ली कसोटीत रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा या दोन गोलंदाजांनी भन्नाट कामगिरी केली आहे. या दोघांच्या फिरकीच्या जादूपुढे ऑस्ट्रेलियाचा संघ गारद झाला. भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 113 धावांवर रोखला होता. या दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने 42 धावांत 7 बळी घेतले होते. तर अश्विनने 59 धावांत 3 बळी घेतले होते. 


पहिल्या दिवशी नेमकं काय झालं? 


दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. उस्मान ख्वाजा (81) आणि पीटर हँड्सकॉम्ब (72) यांच्याशिवाय दुसरा कोणताही फलंदाज या खेळपट्टीवर जास्त वेळ तग धरु शकला नाही. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या 263 धावांत आटोपला होता. भारताकडून मोहम्मद शमीने 4 आणि जडेजा आणि अश्विनने 3-3 बळी घेतले होते. यानंतर पहिल्या दिवशी भारतीय संघाने एकही विकेट न गमावता 21 धावा केल्या होत्या.


दुसऱ्या दिवशी काय घडलं?


दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाचे फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवले.  139 धावांवर 7 गडी गमावल्याने भारतीय संघ कठीण परिस्थितीत अडकला होता.  अशा स्थितीत अक्षर पटेल आणि आर अश्विन यांनी 114 धावांची भागीदारी करत भारतीय संघाला संजीवनी दिली. या भागीदारीमुळं भारतीय संघाने पहिल्या डावात 262 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने 5 तर टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुहनेमनने 2-2 विकेट घेतल्या होत्या.


आज काय घडलं?


ऑस्ट्रेलियाला केवळ एक धावांची आघाडी मिळाली होती. दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्यांच्या फलंदाजांनी एक गडी गमावून 61 धावा केल्या होत्या. म्हणजेच एकूण आघाडी 62 धावांची झाली होती. तिसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाने 61/1 अशा धावसंख्येवरुन आज खेळायला सुरुवात केली. त्यावेळी ट्रॅव्हिस हेड (39) आणि मार्नस लबुशेन (16) क्रीझवर होते. कालच्या 61 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने चार धावांची भर घातलताच अश्विनने ट्रेव्हिड हेडची (43) विकेट घेतली.  यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि लबुशेन यांनी 20 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्मिथ (9) धावांवर बाद झाला. अॅलेक्स कॅरी आणि नॅथन लियॉन यांनी 15 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियन संघाला 95 धावांत 7 विकेट गमावल्यानंतर 100 पर्यंत नेले. अॅलेक्स कॅरीला (7) जडेजाने बाद केले. यानंतर नॅथन लिऑन (8) आणि मॅथ्यू कुहनेमनला (0) देखील जडेजाने बाद केले. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ केवळ 113 धावांपर्यंतच मजल मारु शकला.


महत्त्वाच्या बातम्या:


IND vs AUS 2023: 63 वर्षांचा इतिहास सांगतोय टीम इंडिया दिल्लीत अजिंक्यच... एकदाही पराभव करू शकले नाहीत कांगारू