IND vs AUS 2nd ODI Weather Report: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलियाचे (Australia) संघ आज (19 मार्च) विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने असतील. दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणार्‍या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना असेल. या मालिकेत टीम इंडिया 1-0 नं पुढे आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी हा सामना 'करो किंवा मरो'च्या स्थितीत असेल. कांगारू संघ कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, गेल्या कित्येक दिवसांपासून टीम इंडियानं घरच्या मैदानावर एकही एकदिवसीय मालिका गमावलेली नाही. अशा परिस्थितीत हा सामना अत्यंत रंजक होण्याची अपेक्षा आहे. मात्र, या सामन्यात पावसाचा अडथळा ठरू शकतो. 


देशाच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून हवामान खराब असून पाऊस पडत आहे. विशाखापट्टणममध्येही काहीशी अशीच स्थिती आहे. आज विशाखापट्टणममध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामन्यापूर्वी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. 




पावसामुळे सामन्याच्या उत्साहावर पाणी फिरणार? 


विशाखापट्टणमसह आंध्र प्रदेशच्या अनेक भागांत ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस पडत आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. विशाखापट्टणममधील सामन्यादरम्यान तापमान 26 ते 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर येथे पावसाची 80 टक्के शक्यता आहे. तिथे रात्रीही पावसाची 50 टक्के शक्यता आहे. अशा परिस्थितीत, सामना खेळवताना व्यत्यय येऊ शकतो. तसेच, पावसामुळे सामना रद्द करावा लागण्याचीही शक्यता आहे.


कुठे पाहाल सामना? 


टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांपैकी दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी स्टेडियमवर खेळवला जाईल. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. तसेच, या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केलं जाईल. या सामन्यांचं थेट प्रक्षेपण डिस्ने प्लस हॉटस्टारवर होईल.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसरी वनडे :


टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन 


शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज


ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन 


ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा