Ind Vs Aus 2nd ODI : विशाखापट्टणम (Visakhapatnam ODI) इथे भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा (Australia) वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. "गोलंदाजी करताना माझा प्लॅन अगदी सोपा असतो," असं त्याने म्हटलं. "मी फुल लेंथवर गोलंदाजी करतो आणि स्विंग करण्याचा प्रयत्न करतो. गेल्या 13 वर्षांपासून माझा हाच प्लॅन होता आणि आजही तेच केलं," असं मिचेल स्टार्क म्हणाला.



मिचेल स्टार्कने विशाखापट्टणम इथे खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताविरुद्ध अत्यंत घातक गोलंदाजी केली. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना एकाच षटकात बाद करुन त्याने भारतीय अव्वल फळी उद्ध्वस्त केली. याशिवाय त्याने शुभमन गिलचीही विकेट घेतली. या सामन्यात, स्टार्कने 8 षटकात एक मेडन ओव्हर देत अवघ्या 53 धावांत 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळेच त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.


13 वर्षांपासून माझा प्लॅन बदललेला नाही : मिचेल स्टार्क


सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत स्टार्कने आपल्या यशाच्या रहस्याचा उलगडा केला. वर्षानुवर्षे त्याच प्लानवर सातत्याने काम करत असल्याचं त्याने सांगितलं. स्टार्क म्हणाला की, गेल्या 13 वर्षांपासून माझा प्लॅन बदललेला नाही. मी फुल लेंथवर गोलंदाजी करतो, स्टम्पला मारतो आणि स्विंग करण्याचा प्रयत्न करतो. खूप दिवसांपासून हिच माझी स्ट्रॅटेजी आहे. मी पॉवरप्लेमध्ये विकेट घेण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी जास्त धावाही देतो, पण मी प्रत्येक मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. गेल्या दोन सामन्यांमध्ये मी कोणताही नवीन गेम प्लॅन आखलेला नाही. भारताची फलंदाजी चांगली आहे आणि तुम्ही पॉवरप्लेमध्ये विकेट घेतल्या तरच तुम्ही खेळावर नियंत्रण ठेवू शकता. या सामन्यातही तेच झाले, असं मिचेल स्टार्क म्हणाला.


टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव


दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विशाखापट्टणम वनडेत टीम इंडियाला दहा विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. मुंबई वनडेतील विजयानंतर टीम इंडियाला दुसऱ्या वनडेत मात्र पराभव पत्करावा लागला आणि यासह मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. हा पराभव टीम इंडियाच्या जिव्हारी नक्कीच लागला असणार, याला कारणही तसंच आहे. कारण हा टीम इंडियाच्या वनडे सामन्यांच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव मानला जातोय. महत्त्वाचं म्हणजे, घरच्याच मैदानावर टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. विशाखापट्टणममध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने केवळ 117 धावा केल्या. टीम इंडिया अवघ्या 26 षटकांत गडगडली. टीम इंडियाने दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने 11 षटकांत हे लक्ष्य गाठलं. ऑस्ट्रेलियाने 10 गडी राखून दुसरी वनडे आपल्या खिशात घातली आणि सामना 234 चेंडू शिल्लक असतानाच संपला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये चेंडू शिल्लक असताना टीम इंडियाचा हा सर्वात मोठा पराभव आहे. दोन्ही संघांमधील तिसरा एकदिवसीय सामना 22 मार्च रोजी होणार आहे.