IND vs AUS 1st Test : ऑस्ट्रेलियन संघ (Team Australia) सध्या भारत (India) दौऱ्यावर आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा (Australia) संघ भारतात दाखल झाला आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळला जाणार आहे. पण त्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (Josh Hazlewood) नागपुरात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. दुखापतग्रस्त झाल्यामुळे हेझलवूड हा सामना खेळू शकणार नसल्याची माहिती मिळत आहे. 


गेल्या महिन्यात जोश हेझलवूड सिडनी कसोटीत गोलंदाजी केल्यानंतर डाव्या पायाला दुखापत झाली होती. मात्र, जोश हेझलवूड अद्याप दुखापतीतून पुर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे  टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात हेझलवूड खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. दरम्यान, हेझलवूडने अलूर येथे ऑस्ट्रेलियाच्या प्री-सीरिज कॅम्पमध्येही सहभाग घेतला नाही. 


मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या कसोटीत जोश हेझलवूड खेळू शकणार नाही हे निश्चित असलं तरी तो 7 फेब्रुवारीला नागपुरात गोलंदाजीचा सराव करणार आहे. अशा स्थितीत त्याच्या जागी स्कॉट बोलँडला टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यात अंतिम अकरामध्ये स्थान मिळू शकते.


17 फेब्रुवारीपासून दिल्लीत खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही हेझलवूड अद्याप उपस्थित राहणार की, नाही याबाबतही शंका आहे. भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियासाठी हा दुसरा मोठा धक्का आहे. दरम्यान, दुखापतीमुळे मिचेल स्टार्कही नागपुरात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीत भाग घेऊ शकणार नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला बसलेला हा दुहेरी धक्का आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 


रविवारी ऑस्ट्रेलियाच्या अंतिम सत्रापूर्वी जोश हेझलवूड म्हणाला, "पहिल्या कसोटीत खेळण्याबाबत माझी अजून खात्री नाही. अजून काही दिवस बाकी आहेत. यावेळी कामाचा ताण कमी आहे."


भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात या खेळाडूंचा सहभाग :  


पॅट कमिन्स (कॅप्टन), अॅश्टन अगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन आणि डेव्हिड वॉर्नर. 


मिचेल स्टार्क दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत भाग घेणार नाही. आता जोश हेझलवूड पहिल्या कसोटीतून बाहेर आहे. कॅमेरून ग्रीनलाही अद्याप फिट घोषित करण्यात आलेले नाही. त्यामुळे टीम इंडियासोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडूंच्या दुखापतीचं सत्र सुरू झालं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Vinod Kambli : माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीविरोधात पत्नीची तक्रार, मद्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याचा आरोप