India vs Australia 1st Test : 'ये नया भारत है, घर में घुसकर मारता है...' तिसऱ्या दिवसाचा खेळ पाहिला तर असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने आतापर्यंत संपूर्णपणे वर्चस्व राखले आहे, ज्यामध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले आहे. या कसोटी सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात 150 धावांपर्यंत मर्यादित राहिला होता, पण त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव 104 धावांवर आटोपला, भारताने दुसऱ्या डावात 6 बाद 487 धावा करून डाव घोषित केला. 


तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात तीन गडी गमावून 12 धावा केल्या आहेत. नॅथन मॅकस्विनी खाते उघडू शकला नाही, तर पॅट कमिन्स दोन धावा करून बाद झाला आणि मार्नस लॅबुशेन तीन धावा करून बाद झाला. उस्मान ख्वाजा तीन धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाला अजून 522 धावा करायच्या आहेत. टीम इंडियाला 534 रन्सचं टार्गेट दिलं आहे. बुमराहने आतापर्यंत दोन बळी घेतले आहेत, तर सिराजला एक विकेट मिळाली आहे.


विराट कोहलीच्या शतकाची सर्वांनाच प्रतीक्षा होती. त्याने शतक झळकावताच भारतीय ड्रेसिंग रुमने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. विराटने 143 चेंडूत 100 धावांची नाबाद खेळी केली. त्याने आपल्या खेळीत आठ चौकार आणि दोन षटकार मारले. लियॉनच्या चेंडूवर चौकार मारून विराटने आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 30 वे शतक आणि तिन्ही फॉरमॅटमधील एकूण 81 वे शतक होते. त्याचे हे ऑस्ट्रेलियातील सातवे शतक ठरले. सचिन तेंडुलकरला मागे टाकत ऑस्ट्रेलियन भूमीवर सर्वाधिक कसोटी शतके करणारा तो भारतीय फलंदाज बनला. सचिनने सहा शतके झळकावली होती. विराटशिवाय नितीश रेड्डीने 27 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. नितीश आणि विराटने सातव्या विकेटसाठी 54 चेंडूत 77 धावांची नाबाद भागीदारी केली.


विराटपूर्वी यशस्वी जैस्वालने शतक झळकावले होते आणि 161 धावांची खेळी खेळली होती. त्याने आपल्या खेळीत 15 चौकार आणि तीन षटकार मारले. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे चौथे शतक ठरले. तर केएल राहुलने पाच चौकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलने 25 आणि वॉशिंग्टन सुंदरने 29 धावा केल्या. ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल काही खास करू शकले नाहीत आणि 1-1 धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे नॅथन लायनने 2 तर मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.