Nagpur Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs Aus) यांच्यात नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात (VCA Cricket Stadium) पहिला कसोटी सामना (India vs Australia 1st Test) सुरु आहे. दरम्यान पहिल्या सामन्यातील ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांवर आटोपला आहे. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत ही कमाल केली आहे. यावेळी जाडेजा आणि अश्विन यांनी मिळून तब्बल 8 विकेट्स घेतले आहेत. तर शमी-सिराज यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. जाडेजाने 5 विकेट्स एका डावात घेण्याची कमाल केली आहे.






ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाचा विचार करता सर्वात आधी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक मोठी धावसंख्या पहिल्या डावात करण्याची ऑस्ट्रेलियाची रणनीती होती. पण भारताने अप्रतिम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा हा मनसूबा हाणून पाडला. यावेळी सर्वोत्तम गोलंदाजी रवींद्र जाडेजाने केली. त्याने 22 ओव्हरमध्ये 47 रन देत एकूण पाच गडी बाद केले. दुसरीकडे अश्विनने तीन विकेट घेतल्या. तर सिराज आणि शमीनं प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी अॅलेक्स कॅरी याने 37 तर लाबुशेननं 49 धावांची सर्वाधिक खेळी केली. सामन्यात भारताकडून अगदी सुरुवातीपासूनच चांगली गोलंदाजी सुरु होती. दोन्ही सलामवीरांना शमी आणि सिराजनं बाद केलं. पण त्यानंतर भारताच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचे 8 गडी काही वेळातच बाद झाले. यावेळी सर्वात कमाल गोलंदाजी करणाऱ्या जाडेजाने 5 विकेट्स एका डावात घेण्याची कमाल 11 व्यांदा केली असून चौथ्यांदा ऑस्ट्रेलियासमोर केली आहे.


अश्विनचा जागतिक रेकॉर्ड


सामन्याच्या पहिल्या डावात 3 विकेट्स घेत आर अश्विननं 452 कसोटी विकेट्स नावावर केले असून जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीनं विकेट पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने 89 कसोटी सामन्यात ही कामगिरी केली असून त्याच्या आधी केवळ श्रीलंकेचा दिग्गज मुरलीधरन याने 80 सामन्यांत हा रेकॉर्ड केला आहे. ज्यामुळे त्यानं शेन वॉर्नसारख्या (Shane Warne) दिग्गजांना मागे टाकलं आहे. याशिवाय भारताकडून अशी कामगिरी करणाऱ्यांच्या यादीत अनिल कुंबळेनंतर अश्विन दुसराच खेळाडू आहे. याशिवाय सर्वात कमी चेंडू फेकून ही कामगिरी करणाराही अश्विन दुसरा खेळाडू आहे. त्याने एकूोण 23 हजार 635 चेंडूंमध्ये ही कामगिरी केली असून त्याच्याआधी ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राथने 23 हजार 474 चेंडूत ही कामगिरी केली होती.


हे देखील वाचा-