India A vs Pakistan A: साई सुदर्शन याचे दमदार शतक आणि राजवर्धन हंगरगेकर याच्या पाच विकेटच्या बळावर भारत अ संघाने पाकिस्तान अ संघाचा पराभव केला. राजवर्धन हंगरगेकर याने पाच विकेट घेत पाकिस्तानला मोठ्या धावसंख्येपासून रोखले. पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना साई सुदर्शन याने दमदार शतक झळकावले. पाकिस्तानने दिलेले 206 धावांचे आव्हान भारताने 8 विकेट राखून सहज पार केले. साई सुदर्शन याने विजयी षटकार लगावला. साई सुदर्शन याने नाबाद 104 धावांची खेळी केली.
206 धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. सलामी फलंदाज साई सुदर्शन आणि अभिषेक शर्मा यांनी सावध सुरुवात केली. साई सुदर्शन आणि अभिषेक शर्मा या जोडीने 58 धावांची सलामी दिली. अभिषेक शर्मा 20 धावा काढून तंबूत परतला. मुबासीर खान याने पाकिस्तानला पहिले यश मिळवून दिले. अभिषेक शर्मा याने 28 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 20 धावांचे योगदान दिले. अभिषेक बाद झाल्यानंतर साई सुदर्शन याने निकन जोस याच्यासोबत भारतीय डावाला आकार दिला.
अभिषेक शर्मा आणि जोस यांनी दुसऱ्या विकेटसाठी 99 धावांची भागिदारी केली. या जोडीने संयमी फलंदाजी करत भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला. 157 धावांवर भारताला दुसरा झटका बसला. एम मुमताज याच्या गोलंदाजीवर जोस बाद झाला. जोस याने 64 चेंडूत 53 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या खेळीमध्ये त्याने सात चौकार लगावले. निकन जोस बाद झाल्यानंतर कर्णधार यश धुल आणि साई सुदर्शन यांनी संयमी फलंदाजी केली. साई सुदर्शन याने 110 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 104 धावांची खेळी केली. कर्णधार यश धुल याने 19 चेंडूत 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 21 धावांचे योगदान दिले.
तुळजापूरच्या हंगरगेकरपुढे पाकिस्तानची दाणादाण, 205 धावांत डाव आटोपला
त्यापूर्वी, राजवर्धन हंगरगेकर याच्या भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तान अ संघातील फलंदाजांची दाणादाण उडाली. राजवर्धन हंगरगेकर याने पाकिस्तानच्या पाच फलंदाजांना तंबूत पाठवले. राजवर्धन हंगरगेकर याच्या भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तान अ संघाचा डाव 205 धावांत आटोपला. इमर्जिंग एशिया कप स्पर्धेत भारतीय-अ संघाच्या गोलंदाजांनी पाकिस्तान अ संघाविरोधात भेदक मारा केला. पाकिस्तान अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण टीम इंडियाच्या भेदक माऱ्यापुढे त्यांची तारंबळ उडाली. पाकिस्तान अ संघ पूर्ण 50 षटके फलंदाजीही करु शकला नाही. पाकिस्तान संघने 48 षटकात 205 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून राजवर्धन हंगरगेकर याने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. तर मानव सुतार याने 3 फलंदाजांना तंबूत पाठवले. पाकिस्तानकडून कासिम अक्रम याने सर्वाधिक 48 धावांची खेळी केली.
श्रीलंकामध्ये सुरु असलेल्या इमर्जिंग एशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. या दोन्ही संघाने युएई आणि नेपाळ या संघाचा पराभव केला आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण त्यांची सुरुवात खराब झाली. 9 धावसंख्येवर पाकिस्तानला दोन धक्के बसले. सईम अयूब आणि ओमेर यूसुफ बाद झाले, या दोघांना खातेही उघडता आले नाही. त्यानंतर साहिबजादा फरहान आणि हसीबुल्लाह खान यांनी पाकिस्तानचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण 48 धावसंख्येवर तिसरी विकेट पडली. त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजींनी ये रे माझ्या मागल्या प्रमाणे विकेट फेकल्या. 78 धावांत पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत परतला होता.
पाकिस्तानने 96 धावांत सहा विकेट गमावल्या होत्या. अडचणीत असलेल्या पाकिस्तान संघासाठी कासिम अक्रम आणि मुबासिर खान यांनी संयमी फलंदाजी केली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. मुबासिर 28 धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर कासिम याने मेहरान मुमताज याच्यासोबत 43 धावांची भागिदारी करत पाकिस्तानचा डाव 200 पार नेला. कासिम अक्रम याने 63 चेंडूत 48 धावांची खेळी केली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 48 षटकात 205 धावांवर तंबूत परतला. भारतकडून राजवर्धन हंगरगेकर याने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या तर मानव सुतार याने 3 फलंदाजांना तंबूत पाठवले. निशांत सिंधू आणि रियान पराग यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.